श्रीविहारमध्ये भगिनींचा अनोखा अध्यात्मिक उपक्रम — ‘श्रीविहार श्रीसूक्तपठण महिला मंडळा’ला नऊ वर्षांचा यशस्वी प्रवास

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीविहार सोसायटीत गेली नऊ वर्षे महिलांनी सुरू केलेला एक स्तुत्य अध्यात्मिक उपक्रम म्हणजे ‘श्रीविहार श्रीसूक्तपठण महिला मंडळ’. या मंडळाची सुरुवात स्नेहा, वृशाली आणि गौरी या तीन मैत्रिणींच्या साध्या चर्चेतून झाली. एकदा गणपती मंदिरात बसल्या असताना त्यांना विचार सुचला – “आपण नवरात्रोत्सवाच्या काळात श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम का करू नये?”
या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी सोसायटीतील ज्येष्ठ आणि सक्रिय महिलांशी संपर्क साधला. देशपांडे , ढोले , आशा , सायली धारप आणि पोरेड्डी आणि त्या सर्वांनी या उपक्रमाला मनापासून अनुमती व पाठिंबा दिला.
मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवात नऊ दिवस दररोज संध्याकाळी पाच ते सात या वेळेत वेगवेगळ्या सदस्यांच्या घरी जाऊन श्रीसूक्त पठण केले जाते. या उपक्रमात केवळ श्रीसूक्त पठणच नव्हे तर गणपती स्तवन, कुंकूमार्चन, देवीचा जप, महालक्ष्मी अष्टक, देवीची गाणी, पारंपरिक गोंधळ, जोगवा, दृष्ट काढणे आणि सामूहिक प्रार्थनाही केली जाते.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सहभागी महिलांमधील जबरदस्त उत्साह, सौहार्द आणि सहकार्याची भावना. कुठलाही अडथळा न येता अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडतो.
या अध्यात्मिक उपक्रमामुळे महिला सदस्यांमध्ये एकोपा, विश्वास आणि भावनिक जिव्हाळा अधिक दृढ झाला आहे. नवरात्रोत्सवाचा एक दिवस विशेष भोंडल्याकरिता राखून, त्या दिवसाचेही मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते.
मंडळाच्या सदस्यांचे हे कार्य म्हणजे समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. अध्यात्मिकता, सामाजिक ऐक्य आणि स्त्रीशक्तीचा सुंदर संगम ‘श्रीविहार श्रीसूक्तपठण महिला मंडळा’च्या कार्यातून प्रकर्षाने दिसून येतो.
“आई जगदंबा आमच्यावर अशीच कृपा ठेवो आणि आम्हाला पुढेही समाजसेवेचे बळ देवो,” हीच मंडळातील सर्व भगिनींची एकमुखी प्रार्थना आहे.













