ताज्या घडामोडीपिंपरी
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (RTS) विषयक प्रशिक्षण कार्यशाळा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालयात मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (RTS) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार लोकसेवा हक्क आयोगाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत कामगार उपायुक्त कादंबरी भोसले यांनी अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. शासनाने १५० दिवसाच्या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा सुविधा देण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने पीएमआरडीएमध्ये आरटीएस (RTS) अधिनियमांतर्गत विविध सेवांची कार्यक्षम अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे अधिकाऱ्यांचे कार्यकौशल्य व जागरूकता वृद्धिंगत होणार असून याचा फायदा कर्मचारी आणि नागरिकांना होणार आहे.
कामगार उपायुक्त कादंबरी भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात लोकसेवा हक्क अधिनियमाचे महत्त्व, तक्रार व अपील प्रक्रिया, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज स्वीकृती व स्थिती तपासणी याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणात प्रत्यक्ष उदाहरणे, प्रश्नोत्तरे व चर्चा सत्र घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात प्रशासन विभागाचे उप आयुक्त राजेश माशेरे यांच्यासह विविध विभागप्रमुख, पदनिर्देशित अधिकारी, अपिलीय अधिकारी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग नोंदवला.













