ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

आजही गुरु-शिष्य परंपरा प्रामाणिकपणाच्या धाग्यावरच टिकून – आमदार अश्विनी जगताप

Spread the love

 

पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटामाटात साजरे

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे शिक्षकच करीत असतात. एक शिक्षक उद्याची पिढी घडवतो. स्वतःला प्रामाणिक ठेवण्यासाठी त्यांची ती धडपड दिशादर्शक ठरते. विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाचे धडे गिरविताना आपल्या गुरुजनांशी प्रामाणिकपणे वागावे. आजही गुरु-शिष्य परंपरा प्रामाणिकपणाच्या धाग्यावरच टिकून आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम चॅलेंजर पब्लिक स्कूल हे नेहमीच करत असते. त्यामुळेच शाळेच्या नावाची पताका डौलात सर्वत्र फडकत आहे. शाळेचे हे वार्षिक स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले ते अंतर्मुख करणारे होते ”, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी केले.

निगडीतील ग.दि. माडगूळकर सभागृहात नुकतेच पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटामाटात साजरे झाले. यावेळी दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शाळेचे संस्थापक, अध्यक्ष संदीप काटे, उपाध्यक्षा अनिता संदीप काटे, संचालक संतोष काटे, निलेश काटे, निहारा काटे, लीना काटे, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, पालक आणि मोठ्या संख्येने शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या नृत्याने झाली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतासह‎ सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

शाळेचे संस्थापक, अध्यक्ष संदीप काटे यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. आपल्या मनोगतात सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानाची कवाडे त्यांना पुढे कशी खुली आहेत?, याबद्दल सांगितले. तर शिक्षकांनी देखील स्वतःची गुणवत्ता वाढवली पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शन केले. शिक्षण संस्थेने परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे, त्यामुळे आज संस्थेचा नावलौकिक वाढला आहे. त्यासाठी सर्वानीच मेहनत घेतली, असेही ते म्हणाले.

शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, विद्यालयाच्या परंपरेनुसार दरवर्षी विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘ सप्तक स्पेक्ट्रम ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम निगडीतील वातानुकूलित सभागृहात सादर करण्यात आला. भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.

 

कार्यक्रमाचे  निवेदन सीमा सरदेसाई आणि विन्मय भुते यांनी तर, आभार मल्हार शेळके यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button