ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘शिका आणि घडवा’ उपक्रमाचे आयोजन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थ्यांच्या हातात शिकवण्यासाठी पुस्तकं, समोर ज्ञानग्रहण करण्यासाठी बसलेले अधिकारी… मुलांनी कल्पकतेने रंगवलेली चित्रं आणि त्यांच्या आवाजात घुमणारे धडे… विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न व त्याला उत्तरे देणारे अधिकारी… असे उत्साहपूर्ण, आनंददायी आणि अनुभवांनी भरलेले वातावरण शिक्षक दिनानिमित्त आयोजित ‘शिका आणि घडवा’ या अभिनव उपक्रमात अनुभवायला मिळाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेला हा उपक्रम शिक्षक दिनाला खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना महानगरपालिकेत चालणाऱ्या कामकाजाची माहिती व्हावी या उद्देशाने ‘शिका आणि घडवा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमात महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली तर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासह सहायक सह शहर अभियंता बापू गायकवाड, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, उप आयुक्त सीताराम बहुरे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी संगीता बांगर, उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य, विनय नाळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

‘शिका आणि घडवा’ या कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, मराठी, हिंदी आणि चित्रकला या विषयांचे वर्ग घेतले. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांनी शिक्षकांसारखीच तयारी करून अधिकाऱ्यांना पाठ्यपुस्तकातील धडे शिकवले. विज्ञान विषयात विद्यार्थ्यांनी ‘घर्षण बल’ या धड्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या प्रात्यक्षिकात आयुक्त शेखर सिंह यांनाही सहभागी करून घेण्यात आले.

हिंदी विषयाच्या तासात विद्यार्थ्यांनी ‘वारिस कौन’ ही नाटिका महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून वाचन करून घेतली. त्यानंतर अधिकारी वर्गाला त्या नाटिकेतून नवीन शब्द शोधणे, प्रश्नोत्तर लिहिणे अशी कामे देण्यात आली होती. त्यानंतर वातावरण हलकेफुलके करण्यासाठी पहिलीतील विद्यार्थ्यांनी ‘एक होता कावळा’ हे बालगीत सादर केले.

चित्रकला विषयाच्या वर्गात विद्यार्थ्यांनी संकल्पना चित्रकला, रंगसंगती आणि चित्र रंगवणे या बाबी अधिकाऱ्यांना शिकवल्या. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेने विविध चित्रांची मांडणी करून दाखवली. यामुळे अधिकाऱ्यांना लहानपणीचे चित्रकला तास पुन्हा अनुभवता आले.

मराठी विषयात विद्यार्थ्यांनी ‘जल दिंडी’ हा धडा शिकवला. या धड्यातून नद्यांमध्ये होणारे प्रदूषण आणि त्यावर उपाय याबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पवना नदी सुधार प्रकल्पाची माहिती अधिकाऱ्यांना दिली. पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांच्या जागरूकतेचा प्रत्यय यावेळी आला.

‘शिका आणि घडवा’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. शिकवताना स्वतःचे ज्ञान पक्के करण्याचा अनुभव त्यांनी घेतला. दुसरीकडे अधिकारी वर्गाला पुन्हा एकदा शालेय जीवन अनुभवता आले. शिक्षक दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि अधिकारी वर्गासाठीही संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करताना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व पुस्तक देऊन सत्कार केला.
……
कोट

विद्यार्थ्यांनी शिकवलेल्या या धड्यांमुळे पुन्हा एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. अधिकाऱ्यांसाठी हे क्षण वेगळे आणि आनंददायी होते. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे ज्ञान किती सोप्या पद्धतीने आत्मसात करता येते, हे अनुभवायला मिळालं. ‘शिका आणि घडवा’सारखे उपक्रम केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर समाजालाही सकारात्मक दिशा दाखवतात.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
……
कोट

विद्यार्थ्यांनी घेतलेले वर्ग म्हणजे केवळ शालेय धडे नव्हते, तर जीवनमूल्य शिकवणारे अनुभव होते. त्यांच्या सर्जनशीलतेतून, आत्मविश्वासातून आणि पर्यावरण संवर्धनाबाबतच्या जाणिवेतून पुढील पिढी किती सजग आहे, हे दिसून आले. शिक्षक दिनाच्या या अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवण्याचा पाया अधिक भक्कम होतो.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका इतक्या सहजतेने साकारली की प्रत्येक तास ज्ञानाचा नवा प्रवास ठरला. मुलांच्या कल्पकता, प्रयोगशीलता आणि विचारशक्तीने प्रभावित झालो. अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि शिक्षण प्रक्रियेतील त्यांचा सहभाग अधिक सशक्त होतो.
– किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button