गौरी गणपती सजावट स्पर्धेत ‘नारी शक्ती’ देखाव्याने पटकावला प्रथम क्रमांक
युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित स्पर्धेत चमकली महिलांची कलात्मकता

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आयोजित जिल्हास्तरीय गौरी गणपती सजावट स्पर्धा पिंपरीत उत्साहात पार पडली. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवरील सजावटींनी सहभागी महिलांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आयोजक आणि परिक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेत पूनम सागर गाढवे यांच्या ‘नारी शक्ती’ या देखाव्याने प्रथम क्रमांक मिळवला. समाजात विविध क्षेत्रांत प्रेरणा देणाऱ्या महिलांचे दर्शन घडवणारा हा देखावा विशेष लक्षवेधी ठरला. सुरेखा दीपक कोकणे यांच्या ‘जागरण गोंधळ’ या पारंपरिक देखाव्याने दुसरा, तर सपना सदानंद कांबळे यांच्या ‘नवनाथ जन्म कथा’ या धार्मिक देखाव्याने तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे परीक्षण मृणालिनी मोरे आणि विनीता तिवारी यांनी केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर अशोक जाधव यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेने महिलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देत सांस्कृतिक उत्साहाला चालना दिली.
या स्पर्धेसंदर्भात बोलताना आयोजक चंद्रशेखर जाधव म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांमधील सर्जनशीलता आणि कलात्मकतेला वाव देण्याबरोबरच आपल्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे, सामाजिक आणि धार्मिक विषयांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ प्रदान करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.














