ताज्या घडामोडीपिंपरी

गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत गणेशोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने गणपतीचे विसर्जन सुरळीत, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पडावे, यासाठी महापालिकेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेतर्फे शहरातील महत्त्वाच्या विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जन घाटांवर तैनात करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय पथकात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक व सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे. या पथकांना मुबलक औषधसाठा, आवश्यक ते सर्व वैद्यकीय साहित्य तसेच सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून, वैद्यकीय विभागाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सेवा देण्याची संपूर्ण तयारी केली आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली
अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य समन्वयक सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे आणि महापालिकेचे इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी ही मोहीम राबवत आहेत.

महापालिकेतर्फे प्रभागनिहाय प्रमुख विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक तैनात

१. प्राधिकरण तळे, गणेश तलाव (अ प्रभाग)
२. वाल्हेकरवाडी जाधव घाट (ब प्रभाग)
३. काळेवाडी स्मशान घाट (ब प्रभाग)
४. सुभाषनगर घाट, पिंपरी (ब प्रभाग)
५. वाकड गावठाण घाट (ड प्रभाग)
६. मोशी नदी घाट (इ प्रभाग)
७. चिखली स्मशान घाट (फ प्रभाग)
८. केजुदेवी बंधारा घाट (पवना नदी) (ग प्रभाग)
९. सांगवी घाट (ह प्रभाग)
१०. पिंपळे गुरव घाट (ह प्रभाग)

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. विसर्जन घाटांवर तैनात केलेली वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका ही त्याचाच एक भाग असून, नागरिकांचा उत्सव आनंदी, सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.
– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

गणेशोत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी आरोग्यविषयक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी वैद्यकीय विभाग सतर्क आहे. आपत्कालीन सेवा, आरोग्य तपासणी केंद्रे व औषधोपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत महापालिका सातत्याने लक्ष ठेवून आहे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. औषधसाठा व आवश्यक उपकरणांची व्यवस्था करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना काटेकोरपणे सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. तात्काळ उपचार व रुग्णवाहिका सेवा यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास वैद्यकीय विभाग सज्ज आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button