भाजपमध्ये पुन्हा नाराजीचे वादळ — राजश्री जायभाय यांचा जिल्हा कार्यकारिणी सदस्याचा राजीनामा!
निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान सहन नाही” — पिंपरी चिंचवड भाजपमध्ये वाढती धुसफूस

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड भाजपमध्ये नाराजीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या १६ वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या राजश्री जायभाय यांनी आपले जिल्हा कार्यकारिणी सदस्य पद सोडत अंतर्गत असंतोषाला वाचा फोडली आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात जायभाय यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत सांगितले की, ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नवख्या कार्यकर्त्यांना पदे दिली जात आहेत. यामुळे पक्षातील जुने कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.
“मी पक्षासाठी निष्ठेने काम करत राहणार आहे, परंतु या अपमानानंतर मी पद स्वीकारू शकत नाही,” असे त्यांनी नमूद करत राजीनामा जाहीर केला.
या राजीनाम्यामुळे पिंपरी चिंचवड भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत वादावर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून, यावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














