देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक
आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश

देहूरोड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रस्ते, गटार, कचरा व्यवस्थापन तसेच विद्युत विषयक कामांबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी देहूरोड छावणी परिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली रावत यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. आमदार शेळके यांनी नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेत प्रशासनास ठोस उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांना भौतिक सोयी–सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना वेळमर्यादा निश्चित करून काम पूर्ण करण्यास भाग पाडावे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
यावेळी रावत यांनी माहिती दिली की येत्या काही दिवसांत देहूरोड शहरात “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांना शासकीय दाखले, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदानकार्ड तसेच विविध योजनांचा लाभ सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस विद्युत विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक, सार्वजनिक बांधकाम, महसूल, वन विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी अशोक आप्पा शेलार, प्रवीण झेंडे, रघुवीर शेलार, उमेश नायडू, बाळासाहेब जाधव, तानाजी काळभोर, कृष्णा दाभोळे, किशोर गाथाडे, आशिष बन्सल, नंदू काळोखे, संगिता (नानी) वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले.
नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करून शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्याचा ठोस निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.















