ताज्या घडामोडीपिंपरी

तुषार हिंगे यांचा भाजपच्या ‘जम्बो’ कार्यकारिणीतील शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर चव्हाट्यावर आला असून, नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘जम्बो’ कार्यकारिणीतील शहर उपाध्यक्ष तुषार हिंगे यांनी अवघ्या २४ तासांतच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी २७ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या १२६ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीत हिंगे यांचा समावेश करण्यात आला होता.

वैयक्तिक कारण की अंतर्गत नाराजी?
तुषार हिंगे यांनी दिलेल्या राजीनाम्यामध्ये “वैयक्तिक कारणामुळे” हा उल्लेख केला असला, तरी राजकीय वर्तुळात हे स्पष्टपणे गटबाजीमुळे निर्माण झालेल्या असमाधानाचेच प्रतिबिंब मानले जात आहे. आपल्या राजीनामापत्रात हिंगे यांनी म्हटले आहे की,

“मी, तुषार रघुनाथ हिंगे, कालच माझी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आज मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. आणि यापुढील काळात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्ष वाढीसाठी त्याच जोमाने काम करत राहीन.”

कार्यकारिणी जम्बो पण मतभेद सूक्ष्मतेतून गडद?
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी एकूण १२६ पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करताना “सर्वसमावेशक” कार्यकारिणीचा दावा केला होता. ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष, ८ सचिव, विविध प्रकोष्ठांचे प्रमुख व सदस्य अशा विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पक्षातील सर्व गट समाधानी होतील, अशी मांडणी केली गेली असली तरी हिंगे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे.

भाजपमध्ये वाढते अंतर्गत मतभेद
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्याने भाजपमधील गटबाजी हा एक गंभीर मुद्दा ठरत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते एकीकडे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे कार्यकारिणीच्या निमित्ताने निर्माण झालेली नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते.

शत्रुघ्न काटेंसमोर नेतृत्वाचे आव्हान
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कार्यकारिणीतील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. मात्र तुषार हिंगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा काही तासांतच राजीनामा हे त्या प्रयत्नांचे अपयश दर्शवते. आगामी काळात शत्रुघ्न काटे हे पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाने अशा नाराज नेत्यांची समजूत कशी काढतात आणि पक्षाची एकता टिकवून ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button