ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची सोय

विसर्जन स्थळी ठेवलेल्या कुंड्यांमध्येच निर्माल्य टाकण्याचे नागरिकांना आवाहन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून पारंपरिक विसर्जन सोहळ्यामुळे शहरातील नदीकाठ, तलाव व कृत्रिम जलकुंडांवर भाविकांची मोठी गर्दी होत असते मात्र, या काळात अनेकदा प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, सजावटीचे साहित्य व इतर विघटन न होणारा कचरा थेट पाण्यात किंवा नदीकाठावर टाकला जातो. यामुळे जलप्रदूषण वाढून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे वारंवार दिसून येते.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नदीकाठावर कुठल्याही प्रकारचा प्लास्टिक कचरा अथवा विघटन न होणारे साहित्य टाकू नये. यासाठी प्रत्येक विसर्जन स्थळी निर्माल्य संकलनासाठी विशेष कुंड्या ठेवण्यात आल्या असून, फुले, माळा, पूजेचे साहित्य व इतर जैविक कचरा फक्त या कुंड्यांमध्येच टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाचे प्रमुख उप आयुक्त सचिन पवार यांनी सांगितले की, “नदी व जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. निर्माल्य थेट पाण्यात टाकल्यास ते कुजून प्रदूषण वाढवते. परंतु संकलन कुंड्यांमधून गोळा केलेले साहित्य योग्य प्रकारे खत किंवा इतर पर्यावरणपूरक उपयोगासाठी वापरता येते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होऊ शकतो.”

यावर्षी आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने शहरातील विविध भागांत कृत्रिम जलकुंडांची सोय केली असून, भाविकांनी विसर्जनासाठी त्यांचा उपयोग करावा, असेही आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच थर्माकोल वा प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तूऐवजी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा असेही उप आयुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

नदीकाठ स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ जलस्त्रोत व निरोगी वसुंधरेसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन देखील महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button