पिंपरी-चिंचवड येथे संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत सेना महाराज नाभिक खान्देश मंडळ पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने खंडोबा माळ, आकुर्डी येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजातील सर्व स्तरांतील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री रोहिदास सैंदाणे यांच्या भक्तिमय प्रवचनाने झाली. त्यानंतर मंडळाचे अहवाल वाचन श्री निंबा सोनवणे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र फुलपगारे यांनी केले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त सचिन हिरे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आणि खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत चव्हाण उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नामदेव ढाके यांनी संत सेना महाराजांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “संत सेना महाराजांनी समाजाला एकता आणि समानता या मूल्यांचा संदेश दिला. आजच्या परिस्थितीतही त्यांचे विचार खूप महत्त्वाचे आहेत. समाजाने शिक्षण आणि व्यवसायात पुढे यावे आणि युवकांनी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी.”
मंडळाचे अध्यक्ष अरविंद सैंदाणे आणि उपाध्यक्ष विलास महाले यांनी श्री संत सेना महाराज मंदिरासाठी जागा आणि त्याच्या विकासाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांतून निवृत्त झालेल्या समाजबांधवांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, यावर्षी दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
या सोहळ्यात मंजुळा ग्रुपने मंडळाला पालखी भेट दिली, ज्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. श्रीमती गर्गेताई यांनी अन्नदान करून कार्यक्रमाला हातभार लावला, तर श्री संदीप सोनवणे यांनी संयोजक म्हणून मदत केली.
या सोहळ्याला मंडळाचे संघटक राजाराम सैंदाणे, सल्लागार महाले गुरुजी, मंदिर ट्रस्टी श्रीमती विमलताई सैंदाणे यांच्यासह जितेंद्र पाटील, जितेंद्र चित्ते, रवींद्र वारुळे, रोहिदास सैंदाणे, सचिन महाले, संतोष ठाकरे, कैलास सोनावणे, अनिल सोनावणे, चेतन महाले, लोटन शिरसाठ, देविदास महाले, सुनील वारुळे, नितीन अहिरे, उमेश फुलपगारे, दिनेश फुलपगारे, जयवंत सैंदाणे, रवी महाले, रवींद्र निकम, गणेश वाळूंजकर, अनिता वाळूंजकर, आनंदा महाले, मनोज बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, कमिटी मेंबर्स, उत्सव समितीचे सदस्य, आणि सर्व खान्देश नाभिक बंधू-भगिनींनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. हा सोहळा समाजाला एकोप्याचा आणि प्रगतीचा संदेश देणारा ठरला.













