निगडी दुर्घटना: तीन मजुरांच्या मृत्यू प्रकरणी कष्टकरी कामगार पंचायतचा ठाम पाठपुरावा – बीएसएनएल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट 2025 रोजी पिंपरी-चिंचवडच्या निगडी भागात बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर लाईन दुरुस्तीच्या कामात असलेल्या तीन मजुरांचा डकमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेनंतर बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असून, अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ही घटना समजताच कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी या प्रकरणात तातडीने पुढाकार घेतला. 18 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी निगडी पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलिसांनीही बीएसएनएलकडून सहकार्य न मिळाल्याची कबुली दिली. त्यानंतर डॉ. कांबळे यांनी आकुर्डी व चिंचवड येथील बीएसएनएल कार्यालयांना भेटी देत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली.













