ताज्या घडामोडीपिंपरी

इंद्रायणी व पवना नदी प्रदूषणामुक्तीसाठी पुढाकार! – आमदार महेश लांडगे यांची प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात बैठक घेण्याची मागणी

'पीएमआरडीए' महानगर आयुक्त योगेश म्हसे यांना सूचना

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी आणि पवना नद्यांमधून दररोज पिंपरी-चिंचवड शहरासाठी 500 ते 600 एमएलडी पाणी उचलले जाते. सुमारे 30 लाख नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत असून, त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडे नदी प्रदूषणावर उपाययोजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी तातडीची बैठक घेण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही वर्षांत पीएमआरडीए क्षेत्रात झपाट्याने नागरीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण झाले असून, त्याचा थेट परिणाम इंद्रायणी व पवना नदीच्या प्रदूषणावर झाला आहे. अनेक ठिकाणी विना प्रक्रिया सांडपाणी आणि रसायनमिश्रित औद्योगिक सांडपाणी नदीत सोडले जात आहे. परिणामी, नदीतील जैवविविधता धोक्यात आली असून, पाण्यातील ऑक्सिजनची पातळी शून्यावर पोहचली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, पीएमआरडीए प्रशासनाने पवना-इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, यासाठीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीला गती देणे आवश्यक असल्याचे आमदार लांडगे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

निघोजे व रावेत बंधाऱ्यांच्या वरच्या बाजूस प्रकल्प सुरू करावेत

निघोजे आणि रावेत बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला ज्या ठिकाणी जमीन ताब्यात असून प्रदूषणाची तीव्रता अधिक असल्याने, येथे प्राधान्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी आग्रही भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली आहे. “सुमारे 30 लाख नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने सकारात्मक भूमिकेतून त्वरित निर्णय घ्यावा,” असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

“इंद्रायणी व पवना या नद्या केवळ पाण्याचा स्रोत नाहीत, तर पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्यासाठी जीवनदायींनी आहेत. सुमारे ३० लाख नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होतो, हे लक्षात घेता तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची गरज आहे. निघोजे आणि रावेत बंधाराच्या वरील बाजूस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविणे अत्यावश्यक असून, प्रशासनाने आता गतीने आणि सकारात्मकतेने निर्णय घ्यावा. आणि ऐका ना यासाठी सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे. ”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button