किशोरकुमार यांच्या वैविध्यपूर्ण गीतांच्या मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘जीवन की बगीयाँ महकेगी…’
या किशोरकुमार यांनी गायलेल्या वैविध्यपूर्ण हिंदी – मराठी गीतांच्या नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, संचालक विजय कांबळे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे, विलास गादडे, महीपत वरपे, मोहन भस्मे, विकास जगताप, डॉ. किशोर वराडे, उदय काळे, वंदना केदार, सुवर्णा जोशी, देवेंद्र जोशी, जैबुनिसा शेख, अनिता बिंगेवार, शरद चव्हाण, अस्मिता कुलकर्णी, अंकित गुप्ता, शरद शेजवळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
नंदकुमार कांबळे,
विनायक कदम, तुषार पिंगळे, शुभांगी पवार, आशा, स्वाती पाटील, श्रद्धा कांबळे, ललिता जगदाळे, विजय संबारे, अनिल जंगम, सतीश कापडी, सतीश पेटारे या गायक कलाकारांनी किशोरकुमार यांच्या कृष्णधवल चित्रपटांपासून त्यांच्या सुवर्णकाळातील चित्रपटातील वैविध्यपूर्ण गीतांचे प्रभावी सादरीकरण करीत रसिकांना खिळवून ठेवले. प्रत्येक गीताच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्या गीतनिर्मितीचा तपशील आणि संबंधित चित्रपटातील दृश्य प्रदर्शित करण्यात येत असल्याने चोखंदळ रसिकांना आणि सिनेअभ्यासकांना स्मरणरंजनाच्या निखळ आनंदाची अनुभूती मिळाली.
किशोरकुमार यांच्या गायकीतील आर्तता, अवखळपणा, चिरतारुण्य, याॅडलिंगची चमत्कृती, भावुकता, आनंद अन् शाश्वतता अशा संमिश्र भावभावनांनी ओथंबलेल्या ‘अपनी तो जैसे तैसे…’ , ‘पल पल दिल के पास…’ , ‘चला जाता हूं…’ , ‘तू औरोंकी क्यू हो गयी…’ , ‘बचना ए हसिनों…’ , ‘दिल जलोंका…’ अशा एकल आणि ‘देखा एक ख्वाब तो…’ , ‘शोखीयों में घोला जाये…’ , ‘तेरा साथ हैं कितना प्यारा…’ , ‘सारा प्यार तुम्हारा…’ , ‘तुमसे बढकर दुनिया में…’ अशा युगुल आणि द्वंद्व गीतांना रसिकांनी उत्तम दाद दिली. मैफलीच्या मध्यांतरात नंदकुमार कांबळे यांनी चित्रपटसृष्टीतील नव्या – जुन्या प्रथितयश कलाकारांच्या आवाजाच्या केलेल्या हुबेहुब नकलांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘जीवन की बगीयाँ महकेगी…’ या मैफलीच्या शीर्षकगीताचे अप्रतिम सादरीकरण रसिकांना खूप भावले. ‘जाने कैसे कब कहा…’ , ‘छोड दो आँचल…’ , ‘क्या यही प्यार हैं…’ , ‘सलाम – ए – इश्क…’ अशा किशोरकुमार यांनी अजरामर केलेल्या एकाहून एक सरस गीतांचे बहारदार सादरीकरण मैफलीला कळसाध्यायाकडे घेऊन जात असताना ‘अश्विनी ये ना…’ हा मराठमोळा स्वर रसिकांना आनंदाची पर्वणीच ठरला. विविध वैशिष्ट्यांमुळे रंगतदार झालेल्या मैफलीचा समारोप ‘मैं बंगाली छोकरा…’ या धमाल गीताने करण्यात आला. विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. चिंतन मोढा यांनी संगीत संयोजन केले. राजेंद्र किरवे यांनी ध्वनिसंयोजन केले. विक्रम क्रिएशन आणि दिनेश मानमोडे यांनी तांत्रिक साहाय्य केले. आकाश गाजूल यांनी छायाचित्रण केले. घनश्याम आगरवाल यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले.













