क्रांतिकारक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना कविसंमेलनातून अभिवादन
शब्दधन काव्यमंचाचे देशभक्तिपर क्रांती कविसंमेलन

तळेगाव ढमढेरे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांती दिनाच्या निमित्ताने (दि.९ ऑगस्ट) आद्यक्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे स्मृती स्थळ,तळेगाव ढमढेरे येथे शब्दधन काव्यमंचतर्फे क्रांती काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले.
कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक,पत्रकार अरुण बोऱ्हाडे होते.निवृत्त वायुसेना सैनिक नामदेव हुले, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर,तळेगाव ढमढेरे गावच्या उपसरपंच किर्ती गायकवाड प्रमुख अतिथी होते.
याप्रसंगी ग्रंथपाल शोभा हिंगणे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कंक,हभप अशोक महाराज गोरे, आण्णा गुरव, पांडुरंग सुतार,दत्तात्रय कांगळे यांची उपस्थिती होती.
क्रांतिवीर विष्णू गणेश पिंगळे स्मारकाच्या प्रवेशद्वारापासून ते स्मारक स्थळापर्यंत ‘वंदे मातरम’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘शहीद विष्णू पिंगळे अमर है’ अशा घोषणा देत फेरी काढण्यात आली.
याप्रसंगी अरुण बोऱ्हाडे म्हणाले, “क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.
हसत हसत फासावर गेले. म्हणून आपला देश स्वतंत्र झाला.ही आठवण सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे.देशाचा एक नागरिक म्हणून स्वयंशिस्तीने वागणे, संविधानाचा आदर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे”.
वायुसेना सैनिक कवी नामदेव हुले म्हणाले,”स्वातंत्र्य मिळाले याचा अर्थ प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.देशभक्ती प्रकट करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने तरुणांनी नित्य नवे काम केले पाहिजे.”
उपसरपंच कीर्ती गायकवाड म्हणाल्या, “आमच्या गावातील क्रांतिकारक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मृती जागविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून आपण सर्व कवी येथे आलात याचा आनंद वाटतो”.
याप्रसंगी एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांचा शब्दधन काव्यमंचच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
जाज्वल्य देशभक्तिच्या कविसंमेलनात शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष कवी सुरेश कंक यांनी “हे वंदन आमुचे क्रांतिकारका” ही कविता सादर केली.
“आम्ही तुमचा आदर्श घेऊनि वसा पुढे चालवू” शामराव सरकाळे यांच्या या कवितेने रसिकांची दाद मिळवली.
“काल आणि आज” या परिस्थितीवर कवी नारायण कुंभार यांनी भाष्य केले.
संमेलनात बाळकृष्ण अमृतकर,राधाबाई वाघमारे, फुलवती जगताप,आण्णा जोगदंड,संजय गमे,अंबादास रोडे, सुभाष चव्हाण,बाळासाहेब साळुंके,सुभाष चटणे, मुरलीधर दळवी ,महंमदशरीफ मुलाणी,यांनी देशभक्तिपर रचना सादर केल्या.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मरणार्थ ग्रंथालयास ५१ पुस्तके भेट देण्यात आली. राम सासवडे,अजय शेलार,मारुती ठाकर यांनी संयोजन केले.
सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.कवी तानाजी एकोंडे यांनी क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्याबाबतची माहिती देऊन बहारदार सूत्रसंचालन केले, तर शामराव साळुंखे यांनी आभार मानले.
गायक संजय गमे यांच्यासह संगीताबरोबर सामूहिक राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमानंतर स्मारकासमोरील बागेत बसून सर्व साहित्यिकांनी सोबत आणलेल्या शिदोरीवर ताव मारला.








