डीपी प्लॅनविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा; निवेदन नाकारल्यामुळे उपसभापतींचे पालिकेच्या पायऱ्यांवर ठाण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकताच शहरासाठी सुधारित प्रारुप विकास आराखडा सादर केला आहे. या आराखड्या विरोधात तब्बल पन्नास हजार हरकती नागरिकांनी घेतल्या आहेत. या आराखड्यातील गंभीर त्रुटी, अनियमतता आणि जनविरोधी धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महापालिकेवर महामोर्चा काढण्यात आला. या विरोधातील निवेदन स्वीकारण्यासाठी आयुक्त शेखर सिंह पालिका प्रशासकीय इमारतीत उपस्थित नसल्यामुळे विधानसभा व सभापतींना पालिकेच्या पायऱ्यांवर बसावे लागले. दरम्यान शिष्टमंडळ आयुक्तांना निवेदन देणारा आहेत हे माहीत असताना सुद्धा आयुक्त जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले. त्यांच्या या वागणुकीबद्दल थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे. आणि डीपी प्लॅन विरोधातील निवेदन आता मुख्यमंत्र्यांकडेच देणार असल्याचे विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यातील जनविरोधी आरक्षणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे गुरुवारी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शगुन चौक, पिंपरी येथून सुरू झालेला हा मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत पुणे-मुंबई महामार्गावरून मार्गक्रमण करत महापालिका मुख्यालयावर धडकला.
या आंदोलनात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुख्यालयात गेले. पण, आयुक्त हे विभागीय आयुक्तांची बैठक असल्याचे कारण देवून निघून गेले होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त देखील तिथे उपस्थितीत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निवेदन न देता प्रवेशव्दारावर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली.








