महापालिकेच्या वतीने ‘’जल्लोष शिक्षणाचा २०२४’’ कार्यक्रमाचे आयोजन’
शाळा व विदयार्थी करणार विविध कौशल्यांचे सादरीकरण
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ आणि २४ जानेवारी रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ या भव्य कार्यक्रमाचा शैक्षणिक सराव विविध उपक्रमांद्वारे महापालिकेच्या सर्व १२८ शाळांमध्ये मागील दोन महिन्यांपासून सूरू आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रतिभा, सर्जनशीलता तसेच शिक्षकांचे प्रयत्न आणि नवकल्पना प्रदर्शित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, माजी नगरसदस्य, माजी नगरसदस्या, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योगपती तसेच विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
याबाबत माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ हा कार्यक्रम महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक परिणाम घडवून आणेल अशी आशा आहे. जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमाद्वारे महापालिका शाळांमध्ये सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण तयार होण्यास मदत होत असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले, ‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ हा उपक्रम महापालिका शाळांमधील महत्वाचा घटक आणि शिक्षणाचा उत्सव आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षकांना महापालिका शाळांच्या यशाचे आणि आकांक्षांचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.