महापालिकेच्या लेखा विभागातील भ्रष्टाचार उघड – पदोन्नतीने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली करा – राहुल कोल्हटकर यांची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लेखा विभागातील एक कर्मचारी लाच घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे महापालिकेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. संबंधित व्हिडिओमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून लेखा विभागात पदोन्नतीने एकाच पदावर कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी हेच या भ्रष्टाचाराचे मूळ असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी आयुक्ताकडे निवेदना द्वारे केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत राहिल्याने या कर्मचाऱ्यांचे ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध निर्माण झाले असून, कोणतीही देयक फाईल लाच दिल्याशिवाय पुढे सरकत नाही, असा आरोप नागरिकांनी निवेदनाद्वारे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केला आहे. सदर व्हिडिओची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि लेखा विभागातील वर्षानुवर्षे कार्यरत कर्मचाऱ्यांची त्वरीत बदली करण्यात यावी, अशी नागरिकांची स्पष्ट मागणी आहे.
महानगरपालिकेच्या प्रशासनावर नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आयुक्तांनी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा महापालिकेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली आहे.














