आकुर्डी खंडोबा चौकात महामेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी सोडवा – विशाल काळभोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड परिसरातील आकुर्डी खंडोबा चौक येथे सध्या महामेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र या कामामुळे चौकात मोठा सर्कल तयार झाला असून रस्ताही अरुंद झाल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत चालली आहे. या गंभीर समस्येमुळे स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आकुर्डी-चिंचवड मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी युवा नेते विशाल काळभोर यांनी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवडकडे वळताना मध्येच लागणाऱ्या लाल सिग्नलमुळे अनेक वेळा वाहनचालक व ट्रॅफिक पोलिस यांच्यात वाद होतो. तसेच आकुर्डी ते चिंचवड आणि पुन्हा आकुर्डीकडे येणाऱ्या मार्गावर उभारण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी अजूनच वाढली आहे,
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी बीआरटी मार्गातून वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला काही प्रमाणात उतारा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय, खंडोबा मंदिरासमोरील जय मल्हार चौक (खडी मशीनजवळ) येथेही सध्या सर्कल खूप मोठे आहे. त्याचा व्यास कमी करून योग्य नियोजनासह सिग्नल बसवावा आणि वाहतुकीसाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. याबाबत संबंधित पोलिस निरीक्षकांना अधिकृत पत्र देण्यात आले आहे.
संकल्प परिवर्तनाचा, ध्यास विकासाचा या भूमिकेतून काम करत नागरिकांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुढाकार घेतला असून प्रशासनाकडून लवकरच उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.















