माण गावठाणातील रस्त्याच्या ३६ मीटर रुंदीकरणास ग्रामस्थांचा आक्षेप; पोलिस बंदोबस्तात सीमांकन पूर्ण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडून सध्या आयटी पार्क परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि. २९ जुलै) माण गावठाण हद्दीत रस्त्याचे रुंदीकरण सुरू करण्यात आले.
या कामादरम्यान, अंदाजे १.२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत ३६ मीटरप्रमाणे मार्किंग करण्यात आले. गावठाणातील नागरिकांचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन हिंजवडी पोलिस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मार्किंग प्रक्रियेस मंगळवारी दुपारी सुरुवात झाली. मात्र, ही प्रक्रिया माणदेवी चौकाजवळ पोहोचताच ग्रामस्थांनी ३६ मीटर रुंदीकरणास तीव्र आक्षेप नोंदवला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त केली असून रस्त्याच्या इतक्या मोठ्या रुंदीकरणामुळे अनेकांच्या जागांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली.
तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. नंतर शांततेत मार्किंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी पीएमआरडीएचे अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढील टप्प्यात या भागातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक तोडफोड आणि विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत. ग्रामस्थांच्या भावना आणि समस्या लक्षात घेत या प्रक्रियेची अंमलबजावणी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.













