चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
चिंचवडमध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त सुरांनी सजली गुरुदक्षिणा, गुरूंना अनोखी मानवंदना

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने चिंचवडमधील स्वरत रंग क्लासेस मध्ये एक आगळा-वेगळा कार्यक्रम पार पडला. आपल्या संस्कृतीचा वारसा जपत व गुरुशिष्य परंपरेला साजेशी अशी एक अद्वितीय संगीत मैफल विद्यार्थ्यांनी सादर केली. यामध्ये क्लासेसचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी एकत्र येत आपले निस्वार्थी गुरु – हार्मोनियम, तबला, बासरी व गायन यांचे शिक्षण देणारे विश्वनाथ झावरे यांना सांगीतिक गुरुदक्षिणा अर्पण केली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन, बासरी, हार्मोनियम आणि तबला यांच्या संगमातून विविध रचना सादर करून झावरे सरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. दोन तास चाललेल्या या सुरेल मैफिलीत श्रोते संपूर्णपणे तल्लीन झाले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण समिती सदस्य व ‘वुई टुगेदर फाउंडेशन’चे अध्यक्ष मधुकर बच्चे आणि फाउंडेशनच्या सचिव व आदर्श शिक्षिका मंगला डोळे – सपकाळे हे उपस्थित होते.
मंगला सपकाळे यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व आणि संस्कृतीतील गुरूंची भूमिका यावर अत्यंत मार्मिक व प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी सांगितले की, “गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवणारा असतो. या परंपरेचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता राणे यांनी केले.
या भावस्पर्शी कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.













