ताज्या घडामोडीदेहूपिंपरी
“१७ वर्षांनंतर ऐतिहासिक सोहळा! तुकोबांची पालखी पुन्हा एकदा आळंदी मार्गे देहूत दाखल होणार”

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत परंपरेचा गौरवशाली वारसा जपत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी तब्बल १७ वर्षांनंतर आळंदी मार्गे देहूला परतणार आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, यंदाचा पालखी सोहळा विशेष ऐतिहासिक ठरणार आहे.
यंदा श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष, तसेच तुकाराम महाराजांचे ३७५ वे वैंकुंठगमन वर्ष एकत्र येत असल्याने हा एक अद्वितीय संयोग मानला जात आहे. या विशेष प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी यांनी ११ जुलै २०२५ रोजी तुकाराम महाराज संस्थानला २० जुलै रोजी आळंदी मुक्कामी यावे, असे औपचारिक निमंत्रण दिले होते.
या निमंत्रणाचा स्वीकार करून २० जुलै २०२५ रोजी पालखीचा मुक्काम आळंदीत निश्चित करण्यात आला आहे. यासाठी १९ जुलै रोजी पालखी नेहमीच्या मार्गाने पिंपरीगाव येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहणार आहे. त्यानंतर २० जुलैला भोसरी मार्गे आळंदी कडे प्रस्थान होईल.
पालखी आळंदीत मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी डुडुळगाव, मोशी, टाळगाव चिखली, तळवडे, विठ्ठलनगर मार्गे देहू नगरीत आगमन करेल. हा ऐतिहासिक सोहळा २००८ नंतर प्रथमच आळंदी मार्गे पार पडत असल्याने भाविकांत आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
पालखीच्या स्वागतासाठी डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे या गावांत जोरदार तयारी सुरू असून, पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्याचे आवाहन श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, तसेच वैभव महाराज, गणेश महाराज, विक्रमसिंह महाराज, उमेश महाराज, लक्ष्मण महाराज मोरे यांनी या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
तुकाराम महाराजांची पालखी परंपरेचा आणि भक्तीचा एक महत्त्वाचा भाग असून, त्यामध्ये सहभागी होणे हे अनेकांच्या आयुष्यातील एक अभिमानास्पद क्षण असतो. या ऐतिहासिक सोहळ्यास देहू-आळंदी परिसरात मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने स्वागत केले जाणार आहे.















