ताज्या घडामोडीपिंपरी

“महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण थांबवा!” – आम आदमी पार्टीचा तीव्र विरोध

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या एका वादग्रस्त निर्णयावर आम आदमी पार्टीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’ या खासगी संस्थेकडे पुढील पाच वर्षांसाठी सुपूर्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी महापालिकेच्या निधीतून तब्बल ₹४० कोटी ५३ लाख ७५ हजार खर्च होणार आहे, हे विशेष लक्षवेधी ठरते.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष  रवीराज काळे यांनी याला सार्वजनिक शिक्षणाच्या खासगीकरणाची सुरुवात म्हणत कडाडून विरोध दर्शविला. त्यांनी सांगितले की, “हा निर्णय फक्त आर्थिक बाबतीतच नव्हे, तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अतिशय धोकादायक आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व परवडणारे शिक्षण अधिक दुर्मिळ होणार आहे.”
श्री. काळे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. जांभळे यांना दिलेल्या निवेदनात खालील ठळक मागण्या केल्या आहेत:शाळांच्या खासगीकरणाच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी.संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी व्हावी.महापालिकेच्या निधीतून सरकारी शाळांमध्येच गुणवत्ता वाढवावी.
याशिवाय, केवळ एका संस्थेचा अर्ज येणे आणि त्यालाच थेट काम देणे ही निविदा प्रक्रिया संशयास्पद वाटते, असा आरोप करत खुली स्पर्धा आणि पारदर्शक प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी केली.
“महापालिकेच्या शाळा या गरजू आणि मध्यमवर्गीयांसाठी शिक्षणाचा आधारस्तंभ आहेत. त्या खासगी संस्थांकडे सोपवणे म्हणजे शिक्षणाचे व्यापारीकरण करण्याचा प्रकार आहे,” असे ठाम मत श्री. काळे यांनी मांडले.
“सर्वसामान्यांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही हे खासगीकरण थांबवण्यासाठी संघर्ष करत राहू,” असा इशारा देखील त्यांनी दिला.
यावेळी यल्लाप्पा वालदोर, चंद्रमणी जावळे, कुणाल वक्ते, अजय सिंग, स्वप्नील जेवळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button