गुरु पौर्णिमेनिमित्त कामगार नेते डॉ. बाबा कांबळे यांचा सत्कार

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत रोहिदास प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने कामगार नेते डॉ. बाबा कांबळे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्ली येथे मिळालेल्या पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवीच्या सन्मानार्थ चिखली येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा सत्कार चर्मोद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व राज्यमंत्री दर्जाचे ज्ञानेश्वर कांबळे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी संत रोहिदास विचार समितीचे अध्यक्ष संतोष वाघमारे, दत्तात्रय शिंदे, संत रोहिदास प्रतिष्ठानाचे अध्यक्ष रामेश्वर पाचारे, बाबा पोळ, पांडुरंग सोनटक्के, संतोष वाघमारे, सुनील सोनवणे, रखमाजी गोरे, रोहिदास सोनवणे, बाळू पोळ यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानेश्वर कांबळे म्हणाले की, “डॉक्टर बाबा कांबळे यांचे यश खूप मोठे आहे. महाराष्ट्रातील व्यक्ती दिल्ली येथे जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष होणे सोपे नाही, हे अत्यंत अवघड असे काम बाबा कांबळे यांनी केले आहे. देशातील 28 राज्यांमध्ये फिरून त्यांनी संघटना उभे केले व या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. महाराष्ट्रातील व्यक्ती दिल्लीमध्ये अध्यक्ष होतो, हे महाराष्ट्रासाठी अभिमानाचे आहे. रिक्षा स्टँड अध्यक्ष म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली आणि राष्ट्रीय अध्यक्ष झाले. तसेच, त्यांचा आळंदीतील प्रवास देखील फार महत्त्वाचा आहे. आळंदी येथील ज्या मठामध्ये त्यांनी शिक्षण घेतले, कीर्तन-प्रवचनाचे धडे घेतले, त्याच मठाचे ते आता अध्यक्ष झाले आहेत. असे सर्वसामान्यांमधून विश्व निर्माण करणारे बाबा कांबळे यांना डॉक्टरेट पीएच.डी. पदवी मिळाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आनंद झाला आहे.
डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, “गेल्या 25 वर्षांपासून मी रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, फेरीवाले, बांधकाम मजूर, धुणी-भांडी-स्वयंपाक करणाऱ्या महिला, वाहतूकदार आणि असंघटित कामगार-कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत आहे. देशातील पहिला बांधकाम मजुरांचा कायदा महाराष्ट्रात मंजूर करून घेतला, देशातील पहिला फेरीवाल्यांचा कायदा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मंजूर करून घेतला, रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून घेतले, असे असंख्य कामे आपण केले. हे फक्त कष्टकऱ्यांच्या एकीच्या जीवावर आपण करू शकलो. यामुळे कष्टकऱ्यांच्या संघटनेमध्ये खूप मोठी ताकद आहे. कष्टकऱ्यांच्या संघटनेमुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. त्यांचे प्रश्न सोडवत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अडचणींवर मात करून देशातील सर्व राज्यांमध्ये संघटना उभे करण्यास यश प्राप्त झाले आहे. पुढील काळामध्ये देशातील 45 कोटी कष्टकरी जनतेला म्हातारपणी पेन्शन मिळवून देणे, हे माझ्या जीवनातील स्वप्न आहे आणि त्यासाठी माझा लढा सुरू आहे.” असे ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी नमूद केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुदाम कांबळे यांनी प्रस्तावना केली, रामेश्वर पाचारणे यांनी आभार मानले, बाबा पोळ यांनी सूत्रसंचालन केले.













