ताज्या घडामोडीपिंपरी

हिंजवडी वाहतूक कोंडीवर तातडीची बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार

आमदार शंकर जगताप यांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्क परिसरात रोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत लक्ष वेधले होते. त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० जुलै रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

ही बैठक मुंबईच्या विधान भवनात गुरुवारी (१० जुलै) दुपारी १.४५ वाजता होणार असून त्यामध्ये विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि प्रशासनातील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

शंकर जगताप यांचा पाठपुरावा

आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, “हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो कर्मचारी त्रस्त झाले आहेत. वेळ, इंधन आणि मानसिक त्रास वाढत आहे. रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा यावर तातडीने काम होणे गरजेचे आहे.”

तसेच त्यांनी असेही स्पष्ट केले की, “हिंजवडीसारख्या महत्त्वाच्या आयटी हबचा विकास करताना वाहतूक नियोजन आणि सुविधा याकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळेच हा प्रश्न मोठा बनला आहे.”

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी खालील मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे:

उपमुख्यमंत्री (नगरविकास व गृहनिर्माण)
उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन)
नगरविकास राज्यमंत्री
आमदार शंकर जगताप व महेश लांडगे
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त
पीएमआरडीए आयुक्त
पोलीस आयुक्त (पिंपरी-चिंचवड)
जिल्हाधिकारी, पुणे
महामार्ग, मेट्रो व एमआयडीसी अधिकारी

बैठकीचा उद्देश

या बैठकीत हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यांचे विस्तार, नव्या जोडरस्त्यांची निर्मिती, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

शंकर जगताप म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी इतक्या तातडीने ही बैठक बोलावल्याने नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेतली गेली आहे, हे समाधानकारक आहे. आता यातून काही ठोस निर्णय निघतील असा विश्वास आहे.”

ही बैठक हिंजवडीतील नागरिक, आयटीयन्स आणि वाहनचालकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button