ताज्या घडामोडीपिंपरी
स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या चिमुकल्यांची स्वर दिंडी उत्साहात संपन्न

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुनावळे – काटे वस्ती आणि वाकड – कस्पटे वस्ती येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या देश विदेशातील मुलांनी रविवार, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी अतिशय उत्साहात साजरी केली. साडेतीन वर्षे वयाच्या मुलांपासून विविध वयोगटातील विद्यार्थी या भक्ती दिंडीमध्ये पालकांसह सहभागी झाले होते; तसेच ऑनलाईन पद्धतीने शिकणाऱ्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशातील मुलांनी देखील विठ्ठलनामाचा गजर करून आषाढी एकादशी साजरी केली. विविध भक्तिगीते आणि अभंग गात पायी भक्तिमय दिंडी परिसरातून काढण्यात आली. कस्पटे वस्ती, वाकड येथून निघालेली दिंडी छत्रपती चौक मार्गे विठ्ठल मंदिरामध्ये विसावली. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पावली खेळत, फुगड्या घालत, विठ्ठलनामाचा गजर करत हा सोहळा पुनावळे तसेच वाकड येथील भाविक भक्तांनी अनुभवला. लहान मुलांच्या ओठातून विठुरायाचा गजर ऐकून सारे जण हरकून जात होते.
अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी आणि अथर्व कुलकर्णी यांनी ‘अंतरंगातला देव’ , ‘खेळ मांडीयेला’ , ‘कानडा राजा पंढरीचा’ इत्यादी भक्तिगीते सादर केली. वाकड कस्पटेवस्ती येथील विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष आनंद कस्पटे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, हिरामण कस्पटे यांनी संपूर्ण स्वरोपासना परिवाराचे विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत केले. विशेष बाब म्हणजे पालकांनीही ‘रखुमाई रखुमाई’ या गीतावर ताल धरत सहगायन केले. स्वरोपासना अकॅडमीत शास्त्रीय संगीतासोबत सांस्कृतिक ठेवाही अशा संस्काररूपाने रुजवला जातो, असे स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी यांनी सांगितले. याप्रसंगी लहान मुले वारकऱ्याच्या वेशामध्ये, तालावर ठेका धरताना पाहून पालकही हरखून गेले होते. पालकांनीही पारंपरिक पोशाख परिधान करून मुलांच्या समवेत अभंग वारीमध्ये सहभाग नोंदवला. स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे शास्त्रीय संगीतासोबत आपल्या परंपराही मुलांमध्ये रुजवण्याचा हा स्तुत्य उपक्रम नागरिकांना भावला.













