“आंबेडकर चौकातील रखडलेल्या कामांवर विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांचा खडा सवाल”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील दापोडी ते निगडी दरम्यानच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई, अनियमितता आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिक त्रस्त झाले असून,या गंभीर प्रश्नावर भाजप आमदार अमित गोरखे यांनी विधानपरिषदेत आवाज उठवला.
गोरखे म्हणाले की, “या विकासकामांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दररोज २-३ तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते, कामावर जाणाऱ्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो, आणि संपूर्ण परिसरात अस्वस्थता पसरली आहे.”
विशेषतः मोरवाडी चौक ते चिंचवड चौकदरम्यान रस्ते अरुंद व अर्धवट अवस्थेत असल्याने गंभीर वाहतूक समस्या निर्माण झाली आहे.
कामाचा दर्जा निकृष्ट, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष
नागरिकांच्या तक्रारीनुसार, कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून, सुरक्षेच्या प्राथमिक नियमांचेही पालन केले जात नाही. कार्यरत असलेल्या ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असूनही, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
गोरखे यांनी विधानपरिषदेत सांगितले की, “महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये लागेबांधे असल्याचा नागरिकांचा आरोप असून, त्यामुळे कामात पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव आहे.”या पार्श्वभूमीवर, आमदार अमित गोरखे यांनी संबंधित कामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि तांत्रिक ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेत केली.
त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, प्रशासनाने यापुढे दुर्लक्ष केल्यास आंदोलनात्मक मार्ग पत्करावा लागेल.”प्रशासनाने तातडीने पुढील कामासाठी जागा ताब्यात घ्यावी, रस्ते पूर्णपणे रुंदीकरण करून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढावा, अशी आग्रही भूमिका आमदार गोरखे यांनी मांडली.













