मराठी गझलेवर अनेक समीक्षाग्रंथ प्रकाशित होण्याची गरज – भीमराव पांचाळे
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ,- “मराठी गझललेखनावर आणि गझलगायनावर अनेकानेक समीक्षाग्रंथ प्रकाशित झाले पाहिजेत.त्या दृष्टीनं डॉ.धनंजय भिसे ह्यांनी योग्य पाऊल टाकलं आहे.त्यांनी डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांच्यासारख्या व्रतस्थ गझलकाराच्या ‘अविनाशपासष्टी’ ह्या सध्या गाजत असलेल्या गझलसंग्रहावर भाष्यग्रंथ लिहिला,ही स्वागतार्हच गोष्ट आहे “, अशा आशयाचे गौरवोद्गार प्रसिद्ध गझलगायक ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे ह्यांनी काढले.ते येथील स्व.दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या प्रकाशन समारंभात आणि गझल मुशायऱ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर हे, तर विशेष अतिथी म्हणून आद्य मराठी महिला गझलकार सौ.संगीता जोशी ह्या होत्या.प्रमुख उपस्थितांमध्ये अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य, म.सा.प.च्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे आणि आद्य मराठी गझलसंशोधक, ज्येष्ठ गझलकार डॉ.अविनाश सांगोलेकर हे उपस्थित होते.ह्या समारंभाचे आयोजन गझलपुष्प आणि मातंग साहित्य परिषद ह्या दोन साहित्यसंस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
डॉ.धनंजय भिसे ह्यांनी ” डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांचा ‘अविनाशपासष्टी’ गझलसंग्रह : एक शोध” हा संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथ लिहिला असून तो मुंबईच्या ग्रंथाली ह्या प्रकाशनसंस्थेने सिद्ध केला आहे.त्याचे समारंभपूर्वक प्रकाशन ह्या प्रसंगी भीमराव पांचाळे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांनी आपल्या मनोगतातून सर्वांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून पांचाळे आणि निफाडकर हे दोघे वीस वर्षानंतर एका मंचावर आले,त्याबद्दल समाधान व्यक्त केले.राजन लाखे ह्यांनी एकूणच मराठी गझल आणि तिची होत असलेली समीक्षा ह्या दोहोंबद्दल काही अपेक्षा व्यक्त केल्या.
संदीपान झोंबाडे ह्यांनी डॉ.भिसे ह्यांच्या हातून उत्तरोत्तर अशाच अनेक ग्रंथांची निर्मिती होत राहो,अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.सौ.संगीता जोशी ह्यांनी डॉ.भिसे ह्यांच्या समीक्षाग्रंथाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.भीमराव पांचाळे ह्यांनी सुरेश भटांविषयीच्या, तसेच आपल्या छोट्यामोठ्या गझलविषयक उपक्रमांच्या अनेक आठवणी विशद केल्या.शिवाय गझलगायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रदीप निफाडकर ह्यांनी पिंपरी चिंचवड परिसरात आपण सुरू केलेल्या गझलचळवळीला ‘गझलपुष्प’ ही संस्था चांगल्या प्रकारे पुढे नेत आहे, ह्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि नव्या गझलकारांनी मानसन्मानाकडे,तसेच वादविवादाकडे लक्ष न देता चांगली गझल लिहिण्याकडेच अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.तसेच आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नव्या गझलकरांना संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे गझल चळवळ अधिक समृद्ध होईल.”
स्वागत आणि प्रास्ताविक करताना डॉ.धनंजय भिसे ह्यांनी आपल्या ग्रंथामागील भूमिका प्रांजळपणे विशद केली.
प्रकाशन समारंभाला जोडूनच प्रदीप निफाडकरांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा घेण्यात आला आणि तो उत्तरोत्तर रंगत गेला.त्यात डॉ.अविनाश सांगोलेकर, चंद्रकांत धस, प्रशांत पोरे, दिनेश भोसले, अभिजित काळे, नीलेश शेंबेकर, अनिल नाटेकर हे गझलकार सहभागी होते.मुशायऱ्याचा शेवट निफाडकरांच्या गझलांनी झाला आणि त्यामुळे मुशायरा उंचीवर गेला.प्रकाशन समारंभ आणि गझल मुशायरा ह्या दोहोंचे सूत्रसंचालन दिनेश भोसले ह्यांनी केले.शेवटी भाऊसाहेब आडागळे ह्यांनी आभारप्रदर्शन केले.
अशा ह्या कार्यक्रमाला नरेंद्र पेंडसे,शोभा जोशी,विलास लांडगे, मीना शिंदे, विजय वडवेराव, नंदकुमार मुरडे, मनोज तरोडमल,श्रीकांत चौगुले, डॉ.पांडुरंग भोसले,शोभा जोशी, नरेंद्र पेंडसे,रेखा कुलकर्णी, भगवान पवार, अण्णासाहेब कसबे,नाना कांबळे, रामेश्वर बावणे,राजू खुडे, गणेश कलवले,बाळ माळी (मुंबई), किरण म्हेत्रे (इंदापूर) ह्यांच्यासह अनेक गझकलकार,कवि व गझलप्रेमी आदी उपस्थित होते.