पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजना राबविण्यास स्थायी समितीची मान्यता

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजना राबविणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिका व थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रंगानुभूती: पुर्वरंग ते उत्तररंग प्रयोगकला महोत्सव आयोजित करणे आदी विषयांसहविविध विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
इ क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते सुशोभिकरण देखभाल करणे, मॅगझीन पाण्याच्या टाकीचे व नजिकच्या परिक्षेत्रातील वितरण व्यवस्थेविषयक दुरूस्तीची कामे करणे, ह क्षेत्रीय कार्यालय पाणीपुरवठा अंतर्गत प्रभाग क्र.३१ पाणीपुरवठा विभागाअंतर्गत पाईपलाईनसाठी चर, लिकेजसाठी खोदण्यात आलेले चर इ. ठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करणे, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयनिहाय कचरा संकलन व विलगीकरण जनजागृती करणे, पिंपरी चिंचवड महापालिका मार्फत JnNURM योजनेअंतर्गत स्वस्त घरकुल योजना (इ.डब्ल्यू.एस) चिखली प्राधिकरण पेठ क्र. १७ व १९ मध्ये राबविणे, पॅकेज क्र. ५ व पॅकेज क्र. ६ चे कामासाठी लेबर वेल्फेअर सेसची रक्कम अदा करणे, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर क्र. २३ निगडी येथे टप्पा क्र. १,२,३ व ४ येथे यांत्रिक व तांत्रिक विषयक देखभाल दुरूस्ती करणे, ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवीन तालेरा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर करिता विद्युत विषयक तसेच मेडिकल गॅप पाईप लाईन व इतर अनुषंगिक कामे करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.












