ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रमावळ
‘खंड्या’च्या निधनाने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, मृत्यूपश्चात केले विधी

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशातील प्रत्येक धर्मातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार आणि विधी करण्याचा रिवाज आहे. त्या-त्या रितीरिवाजानुसार हे सर्व विधी केले जातात. परंतु, प्राण्यांवरही आपल्या कुटुंबातील सदस्यच म्हणून प्रेम करणार्या मावळ मधील एका पशुपालकाने आपल्या लाडक्या ‘खंड्या’ बैलावर अंत्यसंस्कार करुन दशक्रियासह विधी पूर्ण केला. या प्रकाराची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी खंड्याचे निधन झाले. त्यानंतर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दशक्रिया विधी देखील विधीवत केला. यानिमित्ताने ह.भ. प. सतीश महाराज काळजे चऱ्होलीकर यांचे प्रवचन होते. त्यांनी प्रवचनातून ‘भूत दया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माजी’ उक्तीनुसार उपस्थितांचे प्रबोधन केले. यावेळी सर्वजण भावूक होवून अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. या अनोख्या प्रेमापोटी केलेल्या विधींची सर्वदूर चर्चा होत आहे.
आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शर्यत पूर्ण करून घाटाचा राजाचा मान मिळवून खंड्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले. खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना त्यांनी रितसर दशक्रिया विधी केला. इतकंच नाही तर खंड्या या बैलाची समाधी उभारून विधीवत पूजा केली. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील नानोली गावात जाधव या शेतकऱ्याने त्याच्या लाडक्या बैलाचा निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तरकार्य केलं आहे. बैलगाडा शर्यतीत खंड्या या बैलाने अनेक विक्रम केले तर रांजणगाव, लोहगाव, चोली, सारख्या 65 हून अधिक ठिकाणी शर्यती जिंकल्या तसेच महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा म्हणून नाव लौकिक खंड्या बैलाने मिळवला होता. मात्र शेवटच्या क्षणी खंड्या या बैलाने घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला. या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने आपल्या घराशेजारीच लाडक्या खंड्या बैलाचा निधन झाल्यानंतर दफन विधी केली आणि त्यानंतर दहावा विधी आणि उत्तरकार्य देखील केले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

कुटुंबाच्या प्रगतीत लाडक्या ‘खंड्या’चा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. तो आमच्या कुटुंबातील लाडका सदस्य होता. त्याच्या प्रेमापोटीच हे सर्व विधी केले.
– राहुल जाधव .









