संभाजीनगर येथे जेष्ठांचा भरला आनंदमेळा

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळच्या सत्रात सिद्धिविनायक मंदिर येथे योगासन ची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. योगशिक्षक अरविंद वाडकर यांनी योगासन व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून दाखवले आणि योगासनांचे महत्व सांगितले. पतंजली चा अष्टांग योग जीवनाला दिशा देतो असे ते म्हणाले.
सायंकाळच्या सत्रात जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांचे *”जगणे सुंदर आहे”* या विषयावर व्याख्यान झाले.
राजेंद्र घावटे म्हणाले की, “मनाला मिळते ते समाधान, शरीराला मिळते ते सुख, आणि आत्म्याला मिळते तो आनंद. भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्त्वाचा आहे. आचार, विचार, आहार, विहार यांच्या द्वारे आदर्श आचरणाने जीवन सुंदर होऊ शकते. आपले जीवन आपणच सुंदर बनवू शकतो. आयुष्य हा ऊनपावसाचा, आशा निराशेचा प्रवास आहे. आयुष्यात येणारी संकटे, अडीअडचणी, नैराश्य, दुःख, सुख, आनंद या सर्व गोष्टीमुळे जगण्याची चव वाढते. दुःखाने माणूस डोळस बनतो आणि अडचणीमुळे अनुभव वाढतात. ज्ञान, प्रज्ञा, व्यासंग आणि सत्संग यामुळे आयुष्याला उजाळा देत समृद्धीकडे वाटचाल करता येते. सिंहावलोकन करून जीवनातील प्रत्येक क्षण जपता आला पाहिजे. मृत्यू हे आयुष्याचे अंतिम आणि अटळ सत्य आहे. त्याची भीती न बाळगता दिलेल्या आयुष्यात स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेवा हा धर्म मानत आंधळ्याचा डोळा, पांगळ्याचा पाय आणि अनाथांचा नाथ होता आले पाहिजे. निसर्गाचा संग, अध्यात्म, पर्यटन, कौटुंबिक जिव्हाळा, विविध छंद, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आदींसाठी केलेले काम यातून आयुष्य जगताना उत्तम अनुभूती मिळते. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी स्वतः सकारात्मक राहून मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करतात आला पाहिजे.” असे सांगताना घावटे अनेक उदाहरणे सांगितली.
परबती वाडकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
याप्रसंगी निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खाडे सर यांनीही मागदर्शन केले . ते म्हणाले की , “सध्याच्या डिजिटल युगामध्ये ज्येष्ठांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. वेगवेगळ्या लिंक व फोन कॉल मार्फत फसवणूक केली जात आहे. जेष्ठांनी कोणतीही लिंक ओपन करू नये. आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. तसेच शेअर मार्केटचा आमिष ,पैसे दाम दुप्पट करून देतो ,बँकेचा मॅनेजर आहे केवायसी पाठवा अशा स्वरूपाचा कोणताही फोन अथवा लिंक असल्यास त्याला कोणतेही उत्तर देऊ नये. ताबडतोब ११२ या क्रमांकावर कॉल करावा.” जेष्ठांसाठी साठी तयार करण्यात आलेल्या “जेष्ठांनुबंध” या ॲप विषयी माहिती सांगून अनेक ज्येष्ठ नागरिकांना ॲप डाऊनलोड करून दिले.
याप्रसंगी निगडी पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाच्या सदस्या उपस्थित होत्या .
सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष परबती वाडकर यांनी संघाने गेल्या नऊ वर्षांमध्ये केलेल्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती दिली, तसेच भविष्यात ज्येष्ठांसाठी कोणती कामे करावयाची आहेत व आरोग्य शिबिर विरंगुळा केंद्र यांची माहिती दिली .
माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते कैलास दुर्गे, आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक विलास जेऊरकर, सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल गोडसे, सावरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय कुरबेट्टी, जेष्ठ नागरिक महासंघाचे सचिव प्रा. हरिनारायण शेळके, सुनील कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माधव धावडेकर यांनी तिसऱ्या वेळी आणि गणेश बेल्हेकर यांनी दुसऱ्या वेळी नर्मदा परिक्रमा केल्याबद्दक विशेष सत्कार करण्यात आला. वयाची अमृतमहोत्सवी वाटचाल करत वैशिष्ट्य पूर्ण कामासाठी शिवाजी पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी वैजनाथ स्वामी, बोराडे काका , अंकुश इंदलकर , सदाशिव आढाव, बहादूर मन्हास, शांताराम पवार, भाकरे, संपत बोत्रे, रामचंद्रन , गणेश बेलेकर, प्रभाकर शेवते, ज्ञानेश्वर बोत्रे यांनी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव दिलीप जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन भिमसेन साळवी यांनी केले.













