ताज्या घडामोडीपिंपरी
श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्त पिंपरीतील शोभायात्रेत सहकुटुंब सहभागी व्हावे : धनराज बिर्दा
जात, पात छोडो, हिंदू राष्ट्र को जोडो चा विचार घेऊन शनिवारी शोभायात्रेचे आयोजन
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या येथे २२ जानेवारीला श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सर्व देशभर उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि यामधे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी शनिवारी पिंपरी, नव महाराष्ट्र विद्यालयाच्या पटांगणात भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक, रामभक्त धनराज बिर्दा यांनी दिली.
मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग ग्रामीण मंत्री नितीन वाटकर, विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड जिल्हा मंत्री धनंजय गावडे, समरसता विषयक सामाजिक कार्यकर्ते विलास लांडगे आदि उपस्थित होते.
धनराज बिर्दा यांनी सांगितले की, जात, पात छोडो, हिंदू राष्ट्र को जोडो हा विचार घेऊन शनिवारी (दि.२० जानेवारी) दुपारी ३:३० वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे. पिंपरी कॅम्प मधील शगुन चौक येथून शोभा यात्रेस सुरुवात होईल यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून हजारो रामभक्त सहभागी होणार आहेत. तसेच महिला मंगल कलश यात्रा काढणार आहेत. पिंपरी गावातील नव महाराष्ट्र विद्यालयात शोभायात्रा आल्यानंतर ‘१०८ राम रसायन होम विधी’ होणार आहेत. प्रमुख संतांच्या मार्गदर्शनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राम भक्तांनी आपल्या कुटुंबासह पारंपरिक वेशभूषे मध्ये सहभागी होऊन या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजक धनराज बिर्दा यांनी केले आहे.