पवनाथडी जत्रेत खवय्यांची गर्दी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयोजित पवनाथडी जत्रेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद भेटत आहे. गतवर्षीच्या पवनाथडी जत्रेच्या तुलनेत यावर्षी नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असून आर्थिक उलाढाल देखील वाढली असल्याची माहिती उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी दिली आहे.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी येथील पी.डब्लू.डी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत होत असलेल्या पवनाथडी जत्रेत खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेत सुमारे आठशे पेक्षा अधिक महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या स्टॉल्सचे शाकाहारी, मांसाहारी आणि इतर वस्तू असे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच महिला बचत गटांची गैरसोय होऊ नये यासाठी स्टॉल्ससह महापालिकेच्या वतीने टेबल, खुर्च्या, विद्युत व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब, सुरक्षा यंत्रणा, मदत कक्ष अशा सेवा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पवनाथडी जत्रेत महिला बचत गटांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये विविध बचत गटातील महिलांनी आपल्या उत्कृष्ट पाककलेचे सादरीकरण केले आहे. मांसाहारी खवय्यांसाठी मासे, मटन, चिकन, विविध प्रकारच्या बिर्याणी अशा विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवानी पाहायला मिळाली. तर शाकाहारी खवय्यांसाठी दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ, पुरण मांडा, पुरणपोळी, छोले मटार करंजी, खोबर करंजी, उकडीचे व विविध प्रकारचे मोदक छोले भटुरे, महाराष्ट्रीयन झुणका भाकरी, थालीपिट, गुजराती ढोकळा, फाफडा, दिल्ली चाट, मेथी धपाटे अशा रुचकर भोजनावर ताव मारण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.
महापालिकेच्या वतीने दिव्यांगांचे बचत गट स्थापन करून त्यांच्यासाठी तसेच तृतीयपंथीय घटकांसाठी देखील स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात आले असून या बचत गटांनीही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सुरु केले आहे. या स्टॉल्सलाही नागरिकांची उस्फुर्त प्रतिसाद भेटत आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांनीही पवनाथडी जत्रेस भेट देऊन तेथील महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थ आणि वस्तूंनी सजलेल्या स्टॉल्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी महिलांची विचारपूस केली आणि त्यांनी बनवलेल्या वस्तूंचे, चविष्ट खाद्यपदार्थांचे कौतुक केले.