महापालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोककल्याणकारी आणि व्यापक असे स्वराज्य निर्मितीचे ध्येय आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात रुजविण्याचे महत्वपुर्ण कार्य करणाऱ्या स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांनी त्यांच्या वीरतेचा, कणखर नेतृत्वाचा आणि अचूक निर्णयक्षमतेचा परिचय सर्वांना दिला त्यामुळे एक आदर्श हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. तसेच विद्वत्ता, त्यागाचे मूर्तीमंत प्रतिक असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी युवाशक्तीला प्रेरणा दिली,असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यप्रेरीत राजमाता जिजाऊ मॉसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
अभिवादन कार्यक्रमात जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता कविता माने, कनिष्ठ अभियंता संध्या साखरे, कार्यालय अधिक्षक मिनाक्षी गरूड, उपलेखापाल गीता धंगेकर, दिप्ती हांडे, दिपाली कर्णे, वनिता फुले, सुरेखा साळुंके, कर्मचारी महासंघ प्रतिनिधी बालाजी अय्यंगार, मुख्य लिपीक माया गिते, सुरेखा सोमवंशी, माया वाकडे, अमेरिका लांडे, तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जन्म झालेल्या राजमाता जिजाऊ मॉसाहेब या स्वत: मुत्सद्दी आणि युद्धनितीमध्ये निपुण होत्या, शिवाय त्या शौर्य आणि दूरदृष्टीसाठी जनमानसांत ओळखल्या जातात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सत्यप्रियता, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रविद्या आणि स्वराज्यस्वप्नाचे संस्कार दिले. त्यांच्या जीवनावर आधारित राजमाता जिजाऊ असे चित्रपट तर स्वराज्यजननी जिजामाता यांसारख्या मालिका प्रसिद्ध आहेत. तर स्वामी विवेकानंद हे थोर विचारवंत आणि युवापिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी निस्वार्थी मानवसेवेला प्राधान्य दिले होते.