शालेय स्तरावर ऑलिंपिया गेम्सचे आयोजन क्रिडा क्षेत्रासाठी उपयुक्त – ऑलिंपिक वीर पै. मारुती आडकर
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रात प्रथमच माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात जिल्हास्तरीय ऑलिंपिया गेम्स क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हे क्रिडा क्षेत्रासाठी उपयुक्त आहे असे प्रतिपादन ऑलिंपिक वीर पै. मारुती आडकर यांनी केले.
बुधवारी (दि.१०) यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार क्रिडा संकुल येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच जिल्हास्तरीय ऑलिंपिया गेम्स क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ऑलिंपिक वीर पै. मारुती आडकर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. तत्पूर्वी महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख, सचिव डॉ. पुरुषोत्तम उपर्वट, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती धनवटे, महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर यांच्या हस्ते क्रिडा ज्योत संचालन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महामंडळाचे सचिव महादेव फपाळ, खजिनदार निळकंठ कांबळे तसेच रज्जाक पानसरे, सरजीत कौर, आशा पालवे, कीर्ती पाल, सीमा भोसले, विद्याराणी वाल्हेकर, नितीन काकडे, राजेश यादव, अनिल जगताप, मुकेश बिरांजे, राकेश प्रसाद, आशिष मालुसरे, राम मुदगल, राधिका काळे, वैशाली इंदलकर, रेणू शर्मा आदी उपस्थित होते.
फुटबॉल (मुले) स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिला सामना एस. बी. पाटील पब्लिक स्कूल (रावेत) विरुद्ध एसएनबीपी (मोरवाडी पिंपरी) संघ यांच्यात झाला. हा सामना एसएनबीपी संघाने दोन गोल करून एस. बी. पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध विजय मिळवला. यामधे आतिफ कर्नलकर आणि दिप पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात एस. पी. एम. विजयी विरुद्ध अभिषेक विद्यालय (२ गोल प्रणव गायकवाड याने केले). प्रियदर्शनी स्कूल विजयी विरुद्ध क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल (श्रेयस पाटील याने एक गोल केला). गुरुवारी झालेल्या सामन्यात एसएनबीपी (बी) मोरवाडी, पिंपरी विजयी विरुद्ध होली मिशन स्कूल ( ईशान जोधा आणि आर्यन कुमार यांनी प्रत्येकी एक गोल केला). एसएनबीपी (ए) विजयी विरुद्ध एसपीएम स्कूल (आतिफ कर्नलकर, दीप पाटील आणि विनय कांबळे यांनी प्रत्येकी एक गोल केला). प्रतिभा स्कूल विजयी विरुद्ध गणेश स्कूल ने हा सामना दोन विरुद्ध एक गोलने जिंकला.
या क्रिडा महोत्सवात बास्केटबॉल (१०,१२,१४ वर्षे मुले, मुली); क्रिकेट (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले, मुली)
हँडबॉल (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले, मुली); हॉकी (१२, १४ वर्षे मुले, मुली); खो-खो (१२,१४ वर्षे मुले, मुली) व लंगडी (१०, १२, १४ वर्षे मुले, मुली) या स्पर्धा आणि वैयक्तिक गटात मैदानी स्पर्धा कराटे (८ ते १४ वर्षे मुले, मुली); रोप स्किपिंग (१०, १२, १४ मुले, मुली) व स्केटिंग (५ ते १४ वर्षे मुले, मुली) या स्पर्धा होणार आहेत. विजेत्या खेळाडू व संघाना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महामंडळाचे मान्यताप्राप्त काम पाहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी www.mahamandal@games.com ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी निवृत्ती काळभोर (९८८१३६५११३) किंव्हा महादेव फपाळ (९८२२६१६७४९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महादेव फपाळ यांनी केले आहे.