‘पसायदान ही सकारात्मक विचारांची विश्वप्रार्थना!’ – डाॅ. चंद्रकांत शेंडकर
वासंतिक व्याख्यानमाला २०२५ - प्रथम पुष्प

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ज्ञानेश्वरमाउलींचे पसायदान ही सकारात्मक विचारांची विश्वप्रार्थना आहे!’ असे प्रतिपादन डाॅ. चंद्रकांत शेंडकर यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘सकारात्मक विचारांचा प्रभाव’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना डाॅ. चंद्रकांत शेंडकर बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नागरिक संघ – चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, कोषाध्यक्ष अरविंद जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, ‘संवाद अन् संपर्क यांच्यातील उत्तम समन्वयातून ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड विविध दर्जेदार उपक्रम राबवित असतो. २९ वर्षांपासून सुरू असलेली वासंतिक व्याख्यानमाला हा त्याचाच एक भाग आहे.’ अशी माहिती दिली. राजाभाऊ गोलांडे यांनी, ‘वृद्धत्वामुळे ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी व्याख्यानमालेतून मनोरंजनासोबत प्रबोधनही होते!’ असे मत व्यक्त केले.
डाॅ. चंद्रकांत शेंडकर पुढे म्हणाले की, ‘सकारात्मक विचारांचा प्रभाव जीवनात खूप महत्त्वाचा असतो. जीवन सुंदर होण्याची सुरुवात ही सकारात्मक विचारांतून होते. छत्रपती शिवाजीमहाराज हे सकारात्मक विचारांचे प्रतीक होते. त्यांनी आपल्या पराक्रमाला अध्यात्माची जोड दिली. चार वेद, सहा शास्त्र आणि अठरा पुराणे यांचे नवनीत म्हणजे माउलींचा हरिपाठ आहे. मन आणि आत्मा यांच्यापासून मेंदूला संदेश दिले जातात. आपण जसे विचार करतो, तशाप्रकारची सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या देहात निर्माण होते. डाव्या आणि उजव्या मेंदूच्या केंद्रभागी दोन भुवयांच्या मधोमध हे ऊर्जाकेंद्र असते. आपण लौकिक जीवनात देहालाच खूप महत्त्व देतो; पण आत्म्याशिवाय देहाला कसलीच किंमत नाही. उदासी, नाराजी, नैराश्य ते आत्महत्या हे नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम आहेत; तर आनंद, सुख, शांती, समाधान ही सकारात्मक ऊर्जेची निष्पत्ती होय. आत्मिक शक्ती अथवा ऊर्जा कमी झाल्यावर मन नकारात्मक विचार करू लागते आणि शरीर विकारग्रस्त होते. ज्याप्रमाणे आत्मा हा देहाला चैतन्यशील बनवतो, त्याचप्रमाणे परमात्मा हा संपूर्ण विश्वाला नियंत्रित करतो!’
रत्नप्रभा खोत, मंगला दळवी, अलका इनामदार, नारायण दिवेकर, राजेंद्र भागवत, नीलिमा कांबळे, मंदाकिनी दीक्षित, सतीश लिपारे, सुधाकर कुलकर्णी, हरिभाऊ क्षीरसागर, सुनील चव्हाण, नंदकुमार मुरडे, भिवाजी गावडे, गोपाळ भसे, श्यामकांत खटावकर यांनी संयोजनात सहकार्य केले. शहाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले.













