टीपी स्कीम तातडीने रद्द करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा चिखली ग्रामस्थांचा इशारा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन शहराचा डीपी आराखडा अंतिम टप्प्यात असतानाही चिखली आणि चऱ्होली गावांमध्ये टीपी स्कीम राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेमध्ये स्थानिक भूमिपुत्र आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सदर टीपी स्कीम तातडीने रद्द करावी, अन्यथा महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा निर्धार ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
टाळगाव चिखली येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री भैरवनाथ टीपी स्कीम विरोधी कृती समितीच्या वतीने आज ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, माजी स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्यासह चिखली गाव परिसर, जाधववाडी, कुदळवाडी, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती या भागातील भूमिपुत्र, उद्योजक, युवक उपस्थित होते.
महापालिकेचा कारभार लोकशाही पद्धतीने झाला पाहिजे, असे अपेक्षीत असताना प्रशासन मनमानीपणे काम करीत आहे. शहराच्या विकासासाठी भूमिपुत्रांनी जमीनी दिल्या आहेत. ‘‘जमीन आमची माय आहे. तिच्यावर डोळा ठेवणाऱ्या प्रशासनला अद्दल घडवू’’ असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.













