‘दासबोधातील एक ओवीदेखील आयुष्य समृद्ध करेल!’ – समीर लिमये

छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला – अंतिम पुष्प
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘धर्मग्रंथांचे केवळ पारायण करण्यापेक्षा जागरूकपणे आत्मसात केलेली समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधातील एक ओवीदेखील आयुष्य समृद्ध करेल!’ असे प्रतिपादन कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक ०४ मे २०२५ रोजी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित चार दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘श्री समर्थांचे नेटवर्किंग’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना समीर लिमये बोलत होते. स्टर्लिंग हॉस्पिटलचे संचालक डाॅ. अभिषेक करमाळकर, उद्योजक अजय मुंगडे, विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिराच्या वतीने समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाचे खंड रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयाच्या अध्यक्षा गीता खंडकर यांना सुपुर्द करण्यात आले; तसेच ‘हिंदुबोध’ या मासिकाच्या प्रती मान्यवरांना देण्यात आल्या. बाबूजी नाटेकर यांनी, ‘इंडोनेशियात रामायण अभ्यासक्रमात शिकवले जाते!’ अशी माहिती दिली. डॉ. अभिषेक करमाळकर यांनी, ‘लहानपणापासून ‘मनाचे श्लोक’ मनावर बिंबवले गेले आहेत!’ अशी भावना व्यक्त केली.
समीर लिमये पुढे म्हणाले की, ‘वास्तविक ‘मनाचे श्लोक’ माहीत नाही, असा मराठी माणूस सापडणार नाही; मात्र, तरीही फ्रॉईड हा आपला स्टेटस सिंबाॅल झाला आहे. राम हा आपल्या देशाचा सांस्कृतिक ऑयडॉल आहे; पण त्याच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडविले जातात तेव्हा पुरेशा अभ्यासाअभावी आम्ही त्यावर प्रत्युत्तर देऊ शकत नाही. समर्थ रामदासस्वामी यांनी वयाच्या बारा ते चोवीस या काळात नाशिक येथे पुरश्चरण करून अखंड रामनामाचा जप करीत तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांनी वयाच्या चोवीस ते छत्तीस या टप्प्यात अफगाणिस्तान ते श्रीलंका पायी तीर्थाटन केले. यावेळी त्यांनी देश, काल, स्थितीचे डोळस अवलोकन केले.
‘पहिले ते हरिकथा निरूपण |
दुसरे ते राजकारण |
तिसरे ते सावधपण |
सर्व विषई ||’
असे तत्त्व अंगीकारून मुगल काळात बारा वर्षांचे तीर्थाटन पूर्ण झाल्यानंतर महाबळेश्वर येथे चिंतन करून सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. राजकारणात सक्रिय असलेले ते एकमेव संत आहेत. महाबळेश्वर येथे त्यांनी पहिला मठ स्थापन केला. अकरा भाषा आत्मसात करून देशभरात अकराशे मठांची स्थापना केली.
‘मराठा तितुका मेळवावा |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |’
हे ब्रीद घेऊन आताच्या सारखी संपर्काची कोणतीही साधने उपलब्ध नसताना समर्थ रामदासस्वामी यांनी उभे केलेले हे नेटवर्किंग थक्क करणारे आहे.
‘ठाई ठाई शोध घ्यावा |
मग ग्रामी प्रवेश करावा |
प्राणिमात्र बोलवावा |
आप्तपणे || श्रीराम ||’
या वचनानुसार त्यांची कार्यपद्धती होती. रोज नवीन गावात जाऊन पाच ठिकाणी भिक्षा मागून त्यांनी जनसंपर्क वाढविताना
‘राखावी बहुतांची अंतरे |
भाग्य येतें तदनंतरे |
ऐसी हें विवेकाची उत्तरें |
ऐकणार नाही ||श्रीराम ||’
अशाप्रकारे समाजमनाची जोडणी केली. कामाचे व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन करून त्यांनी उभारलेल्या अकराशे मठांपैकी सुमारे ३५० मठ अजूनही कार्यरत आहेत. त्यामुळेच विनोबा भावे यांनी ‘मनाचे श्लोक’ हे मनाची उपनिषदे आहेत, असे गौरवोद्गार काढले आहेत!’
आताच्या आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातील संज्ञांची समर्थवचनांशी सांगड घालीत समीर लिमये यांनी चित्रफितीच्या साहाय्याने मार्मिक शैलीतून विषयाची मांडणी केली.
धनश्री नानिवडेकर यांनी तांत्रिक साहाय्य केले. रश्मी दाते आणि ॲड. हर्षदा पोरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. विकास देशपांडे यांनी नियोजन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या विविध विभागातील पदाधिकाऱ्यांनी व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे सहसचिव राजेंद्र देशपांडे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला.













