हिट अँड रनविरोधात आज (9 जानेवारी) मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात होणार ; बाबा कांबळे यांची माहिती
दिशाभूल थांबवा, अन्यथा ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढू
– बाल मलकित सिंग यांना बाबा कांबळे यांचा इशारा ; देशभरासह महाराष्ट्रामध्ये ट्रक चालकांचा चक्काजाम आंदोलनाचा निर्धार कायम
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारशी चर्चा झाली असून ९ जानेवारीपासून ट्रक चालक आंदोलन करणार नाहीत अशी चुकीची आणि गैरसमज निर्माण करणारी माहिती अन्यथा ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कोअर कमिटीचे बाल मलकीत सिंग देत आहेत. वास्तविक पाहता भारतीय काँग्रेस ही संघटना उद्योजक भांडवलदारांची संघटना आहे. या संघटनेचा चालकांशी कोणताही संबंध नाही. देशातील 25 कोटी चालकांच्या नेतृत्व करणाऱ्या संघटना माझ्यासोबत असून बाल मलकित सिंग बल यांनी आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कोअर कमिटी कार्यालयावर देखील तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस कोअर कमिटी अध्यक्ष बाल मलकित सिंग यांनी देशभरातील ट्रक चालकांची बाजू घेणे अपेक्षित आहे. मात्र त्यांनी केंद्र सरकारच्या बाजूने आपली धोरणे मांडायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, अद्याप हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाही. त्यामुळे ९ जानेवारीपासून राज्यासह देशभरात ट्रक चालकांचा कोणताही संप होणार नसल्याची खोटी आणि चुकीची माहिती बाल मलकित सिंग यांनी माध्यमाद्वारे दिली आहे. वास्तविक पाहता सिंग हे उच्चभ्रू लोकांचे नेतृत्व करणारे आहेत. मात्र हिट अँड रन कायद्याचा सर्वाधिक फटका गोरगरीब सर्वसामान्य ट्रक चालकांना बसणार आहे. त्यामुळे सिंग यांचा या आंदोलनाशी काडीमात्र संबंध नाही. तरी देखील ते खोटा आव आणत आहेत. त्यांनी या आंदोलनाच्या उभारणीत कोणतेही योगदान दिलेले नाही. असे असताना कोणत्या अधिकाराने आंदोलन होणार नसल्याचे ते सांगतात असा संतप्त सवाल बाबा कांबळे यांनी उपस्थित केला. त्यांनी ही दिशाभूल थांबवावी अन्यथा त्यांनाही ट्रक चालक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
हिट अँड रन प्रकरणी दिल्ली, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशसह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये देखील हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून 9 जानेवारीला मध्यरात्रीपासून हे आंदोलन तीव्र करून चक्काजाम करण्याचा निर्धार ट्रक चालकांनी केला असल्याची माहिती ऑटो रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली. राज्यभरातील विविध संघटना देखील या मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती ऑटो बाबा कांबळे यांनी दिली.
*चौकट : महाराष्ट्रात ट्रक चालक संघटना आंदोलनावर ठाम* –
ट्रक चालकांवर अन्याय करणारा कायदा रद्द करण्यासाठी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात आले. तसेच पंजाब येथील आंदोलनात देखील बाबा कांबळे यांनी सहभाग घेतला. तसेच देशाच्या विविध भागात दौरा करून ते 9 जानेवारीला महाराष्ट्र मध्ये येणार आहेत. विविध संघटनांशी चर्चा केली असून चक्का जाम आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो सर्व चालक-मालक सहभागी होणार आहेत, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली
देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन सुरू आहे. परंतु सरकार मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. देशभरातील 25 कोटी चालकांच्या संघटनांसोबत चर्चा करून ठोस मार्ग काढणे गरजेचे आहे. बाल मलकित सिंग यांच्यासारख्या दिशाभूल करणाऱ्या माणसांना हाताशी धरून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर हे आंदोलन अधिक आक्रमक होईल. राज्यभरातील चालकांनी ९ जानेवारी पासून होणारे आंदोलन शांततेने लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवा. कोणत्याही प्रकारची हिंसा व जनजीवन विस्कळीत होणार नाही याची खबरदारी घेऊ. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थासमोर आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधू.