यमुनानगर निगडी येथील प्रबोधनकार केशवराव ठाकरे क्रिडा संकुल व अपंग विद्यालयाच्यामध्ये असलेल्या रस्त्याला ‘हॉकर्स झोन मंजुर करा – प्रसाद कोलते

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -यमुनानगर निगडी येथील प्रबोधनकार केशवराव ठाकरे क्रिडा संकुल व अपंग विद्यालयाच्यामध्ये असलेल्या रस्त्याला ‘हॉकर्स झोन’ म्हणून मंजूर करण्यात यावा अशी मागणी यमुनानगर निगडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसाद गणपत कोलते यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्त्यावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहनचालक वेडीवाकडी कुठेही गाडी पार्क करुन जात असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांची व इतर वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
केशवराव ठाकरे क्रीडा संकुल आणि अपंग शाळा दरम्यानच्या रस्त्यावरील वाढत्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.या गुंतागुंतीत आणखी भर म्हणजे या मार्गावर फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाले यांच्याकडे सध्या नेमुन दिलेल्या जागा नसल्याने त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. या सर्व गोष्टीं लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री प्रसाद गणपत कोलते (पि.चि.शहर जिल्हा) यांनी महापालिका प्रशासनाकडे या भागात ‘हॉकर्स झोन’ स्थापन करण्याची मागणी केली आहे.
‘हॉकर्स झोन’ निर्माण झाल्यास केवळ वाहतुकीची समस्या दूर होणार नाही तर विक्रेत्यांना त्यांच्यासाठी राखीव असलेली जागा देखील उपलब्ध होईल,या शिवाय सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल.व पर्यायाने परिसरातील व्यावसायिकांची कामे व्यवस्थित आणि कार्यक्षमतेने चालण्यासही हातभार लागेल. अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.









