काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तीव्र प्रतिक्रिया; अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी तत्काळ पुढाकार
"अशा दहशतवादी कारवायांमागील विघातक शक्तींना भारतीयांच्या एकजुटीचे जोरदार प्रत्युत्तर मिळेल"- डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती कार्यालयात अर्पण करण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायक असून, या घटनेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पुण्यातील काही पर्यटक काश्मीरमध्ये अडकले असल्याची माहिती समजताच, डॉ. गोऱ्हे यांनी तत्काळ ज्योती झुरंगी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. शासनाकडून लवकरच विमान व्यवस्थेची योजना आखली जात असून संबंधितांना याबाबत लवकरच माहिती कळवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अडकलेल्या पर्यटकांची जे स्थानिक रहिवासी काळजी घेत आहेत, त्यांचेही त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. “स्वतःचीही काळजी घ्या आणि महाराष्ट्रात परतल्यावर संपर्क साधा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
या हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना आज विधान भवन येथील उपसभापती कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतात एकात्मतेची गरज अधोरेखित करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “अशा दहशतवादी कारवायांमागील विघातक शक्तींना भारतीयांच्या एकजुटीचे जोरदार प्रत्युत्तर मिळेल.”
हल्ल्यानंतर तत्काळ मदतीसाठी पुढे सरसावलेल्या भारतीय लष्कराचे जवान, स्थानिक रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्यसेवकांचे त्यांनी विशेष आभार मानले. “या संकटाच्या वेळी जीव धोक्यात घालून मदत करणारे हे खरे देशनिष्ठ वीर आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
शिवसेना नेत्या आणि उपसभापती म्हणून डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख करत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले. *”एकसंघ भारत हीच अशा घटना रोखण्याची खरी ताकद आणि खरी श्रद्धांजली आहे,”* असेही त्या म्हणाल्या.















