राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहर मुख्य समन्वयकपदी प्रशांत सपकाळ यांची नियुक्ती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहर मुख्य समन्वयक पदी प्रशांत सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपकाळ यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. ६ जानेवारी) मोशी, देहू आळंदी रोड येथील रामकृष्ण मंगल कार्यालय याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांच्यासह पक्षाचे माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियुक्तीनंतर बोलताना प्रशांत सपकाळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक अजित पवार, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाची जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती जबाबदारी सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. या पदाच्या माध्यमातून मी शहरातील युवकांपर्यंत पक्षाची ध्येय-धोरणे आणि विचार पोहचवून जास्तीत जास्त युवा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या विचारधारेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे, सपकाळ यांनी सांगितले.









