सेवाभावी डॉक्टर विकसित भारताचे ‘ॲम्बॅसिडर’! – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत
– अटल महाआरोग्य शिबिरामुळे शेवटच्या घटकाची सेवा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या पिढीला हा दिवस पहायला मिळाला. ‘‘आत्मनिर्भर भारत’’ हा मोदींचा संकल्प आहे. कोविड काळात १२० कोटी भारतीयांना लस देवून आरोग्य सेवा दिली. जगातील १०३ देशांना भारताने लस पुरवठा केला. ‘विकसित भारत… आत्मनिर्भर भारत’ या निर्धाराला साथ देण्यासाठी डॉक्टर विकसित भारत संकल्पनेचे ‘ॲम्बॅसिडर’ आहेत, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अटल महाआरोग्य विनामूल्य शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, भाजपाचे संदीप खर्डेकर, संजीवीनी पांड्ये, आरोग्य सेवाचे सहसंचालक राधाकिशन पवार, डॉ. सचिन देसाई, डॉ. लक्ष्मण गोफणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचे कल्याण होईल, असे लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांचे सूत्र होते. जीवन किती जगले, यापेक्षा कसे जगले, हे महत्त्वाचे आहेत. तसेच, ‘‘भाऊ कसा असावा? याचे आदर्श उदाहरण म्हणजे शंकर जगताप आहेत.’’ लक्ष्मण जगताप यांचे कार्य त्यांनी सक्षमपणे पुढे चालवले आहे. आदर्श पत्नी म्हणून आमदार अश्विनी जगताप लक्ष्मण जगताप यांचा वारसा चालवत आहेत, असे गौरोद्गारही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले आणि आभार माजी महापौर माई ढोरे यांनी मानले.
अंत्योदयाच्या विचाराने आयोजित केलेल्या अटल महाआरोग्य शिबिरामध्ये लाखो नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होणार आहे. गोरगरिबांसाठी त्यामुळे आधार मिळाला आहे. हे कार्य ईश्वरीय आहे. त्याची प्रेरणा स्व. लक्ष्मण जगताप आहेत. त्या प्रेरणेतून शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप काम करीत आहेत.
– चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.