श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकरी संप्रदायाबद्दल माझे मनात आदर आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देहू देवस्थानने मला त्यासाठी संस्थान ने योग्य समजले. हे माझ्या साठी फार भाग्याचे आहे. पुरस्कार दिल्या बद्दल मी संस्थानचा मनापासून आभारी आहे. वारकऱ्यांची देखील सेवा करण्याची संधी मला या पुरस्कारातून मिळाली आहे, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली आहे. अशा पवित्र भूमीमध्ये हा पुरस्कार मला मिळतोय याच्या पेक्षा दुसरं भाग्य नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदासमहाराज मोरे, अजय महाराज मोरे, योगीराज महाराज गोसावी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शरद सोनवणे, विजय बापू शिवतारे, माजी आमदार विलास लांडे, देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचे सह राज्यातून आलेले मान्यवर महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, देवस्थानचे विश्वस्त आदी मान्यवर वारकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







