ताज्या घडामोडीपिंपरी

अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची पीएमआरडीएकडून आखणी

सोमवारपासून नियोजन : महामार्गासह मुख्य रस्त्यांवर होणार संयुक्त कारवाई

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणाने पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणविरुद्ध मोहिम यशस्वी पूर्ण होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी १७ ते ३० मार्चदरम्यान करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमिनदोस्त करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या संयुक्त कारवाईमध्ये पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, एमएसईबी आदी विभागांमार्फत ३ ते १३ मार्चपर्यंत २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला आहे. यासह अनेक स्थानिकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेतली. या अतिक्रमणविरुद्धच्या मोहिमेचा पहिला टप्पा संपत आला असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात पुणे शहराच्या महामार्गासह मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणावर विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १७ ते ३० मार्चदरम्यान संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईमध्ये महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगत असणाऱ्या दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहे. पुढील टप्प्यामध्ये संयुक्त कारवाई ही पुणे व पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे महामार्ग व रस्त्यांवर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमण कारवाई १७ ते ३० मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे पीएमआरडीए, पुणे म.न.पा, पिंपरी चिंचवड म.न.पा हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे यासह कोणतेही बांधकाम पूर्वपरवानगी घेऊनच करावेत, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

महामार्गाचे नाव, कारवाईची तारीख
१) पुणे–सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे) दि. १७ ते ३० मार्च २०२५
२) सुस रोड, दि. १७ ते ३० मार्च २०२५
३) हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट, दि. १७ ते ३० मार्च २०२५
४) नवलाख उंब्रे ते चाकण, दि. १७ ते ३० मार्च २०२५
५) हिंजवडी परिसर – माण, दि. १७ ते ३० मार्च २०२५
६) तळेगाव – चाकण – शिक्रापूर, दि. १७ ते ३० मार्च २०२५

विविध रस्त्यांवर १३ मार्चपर्यंत झालेली कारवाई
१) पुणे–नाशिक महामार्गावरील चिंबळी (बर्गेवस्ती) ते सांडभोरवाडीपर्यंत अंदाजे २९ किलोमीटर परिसरात ३ ते १३ मार्चपर्यंत ८९८ अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून त्याचे अंदाजे क्षेत्रफळ ८९८०० चौ. फूट आहे.
२) पुणे-सोलापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूने अंदाजे ३३ किलोमीटर परिसरात १०४७ स्ट्रक्चर्सवर कारवाई करण्यात आली असून त्याचे अंदाजे क्षेत्रफळ १०४७०० चौ. फूट आहे.
३) चांदणी चौक ते पौड रस्त्याच्या बाजूस अंदाजे २१ किलोमीटर परिसरात ५५७ स्ट्रक्चर्सवरील कारवाई अंदाजे क्षेत्रफळ ५५७०० चौ. फूट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button