शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांचा ठाकरे गटाला रामराम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आज प्रवेश करण्याची शक्यता


चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना चिंचवड विधानसभेच्या संघटन बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पक्षाचे कट्टर कार्यकर्ते संतोष सौंदणकर यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत, शहर संघटक पदाचा राजीनामा दिला आहे.


ते आज बुधवारी सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत शिवसेनेच्या जिल्हा संघटिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे, भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी शहराध्यक्ष रामभाऊ उबाळे यांच्यासमवेत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहर शिवसेना बॅकफुटवर गेली आहे. अशा वेळी शहराध्यक्षांना मोठी भुमिका पार पाडावी लागते. ढासाळलेल्या गडाची डागडुजी अपेक्षित असते. मात्र, पक्षात शहराध्यक्ष आहेत की नाही? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सौंदणकर हे शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी निष्क्रिय शहराध्यक्षांना न हटवता त्यावर प्रभारी अध्यक्षाची नेमणूक केली. पक्षात अनेक चांगले कार्यकर्ते असतानादेखील त्यांना संधी न दिल्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज झाले आहेत.
दरम्यान पक्षाच्या अडचणीच्या काळात सौंदणकर यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात संघटन बांधणी मजबूत केली होती. त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील या मतदारसंघात आहे. तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी शिवसेनेशी जोडले आहे. त्यामुळे सौंदणकर यांच्याबरोबर किती कार्यकर्ते ठाकरे गटाला रामराम ठोकणार हे लवकरच कळेल.










