पिंपळे निलखमध्ये बांधकामाच्या अतिरिक्त लाभासाठी दुसऱ्याचा रस्ता दाखवला स्वमालकीचा
बांधकाम परवानगी विभागातील अधिकाऱ्यांचा कानाडोळा जागा मालकाचा कोर्टात जाण्याचा इशारा


पिंपळे निलख (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बांधकाम व्यवसायिकाने दुसऱ्याचा तीन मीटर रस्ता हा स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवत त्याद्वारे बांधकाम परवानगी मिळवून जागा मालक संदीप काटे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक केली आहे. हा प्रकार नुकताच पिंपळे निलख येथे घडला आहे.


दरम्यान यात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकारी आणि बांधकाम व्यवसायिक यांच्यात आर्थिक हितसंबंध जोपासले गेल्याचा आरोप जागा मालक काटे यांनी केला आहे. सबंधित फसवणुकीच्या आधी महापालिकेचे उपअभियंता यांना कल्पना दिली होती. वेळेत कारवाई झाली नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाचे फावले आणि फसवणुकीच्या माध्यमातून बांधकाम परवानगी मिळवत टीडीआर आणि एफएसआयसाठीची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती काटे यांनी दिली.

सविस्तर हकीकत अशी की, पिंपळे निलख परिसरात अडीच एकरमध्ये एका गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. त्याच्या अगदी शेवटीच मंगलमुर्ती डेव्हलपर्स नामक अतुल कांकरिया यांनी विकसनासाठी दहा गुंठे जागा घेतली होती. त्यावेळी त्यांना जाण्या येण्याच्या वहीवाटीसाठी वीस फुट रस्ता दिला होता. दरम्यान संबंधित बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यासाठी केवळ सहा मीटरचे अधिकार होते. बांधकाम परवानगीसाठी जाणूनबुजून त्यांनी नऊ मीटरचा रस्ता दाखवत महापालिकेची बांधकामाची परवानगी मिळविली. बांधकामाचे अतिरिक्त लाभ मिळविण्याच्या उद्देशाने जागा मालकाचा तीन मीटर रस्ता बळकावला. फसवणूक करीत त्याद्वारे जादाचे बांधकाम हक्क प्राप्त करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून सुरु आहे. परवानगी विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे हेतुपूर्वक कानाडोळा केला. त्यामुळे आर्थिक हितसंबंध जोपासले गेल्याचीही शक्यता बळावली आहे.
या प्रकरणी बांधकाम परवानगी विभागातील उपअभियंता शाम गर्जे आणि कनिष्ठ अभियंता यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. सदर बांधकाम व्यावसायिक हा माझ्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचीही फसवणूक करण्याच्या इराद्यात आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाचा छडा लावून दोषी अधिकारी आणि मंगलमुर्ती डेव्हलपर्सचे अतुल कांकरिया यांच्यावर कारवाई करावी. न्याय न मिळाल्यास प्रसंगी कोर्टात जाणार आहे.
– संदीप काटे, जागा मालक…
मी साईट व्हिजीटला आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
– शाम गर्जे, उपअभियंता – बांधकाम परवानगी विभाग










