“जागतिक महिला दिनानिमित्त जीवनविद्या मिशनतर्फे स्त्रीशक्तीचा उत्सव”


चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिनानिमित्त जीवनविद्या मिशन चिंचवड केंद्रात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका माननीय अश्विनीताई चिंचवडे यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख वक्ता म्हणून जीवनविद्या मिशनच्या शोभना अष्टपुत्रे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा मोराणकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री बाळासाहेब, मरळ,जयरामणा,(PI) कमलाकर चौधरी,यांनी केले असून आभारप्रदर्शन अमृता भिसे यांनी केले.


कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरु श्री वामनराव पै माऊली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर अष्टपुत्रे ताईंनी ‘निसर्गाचे नियम आणि स्त्री’ यावर अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महिलांचे जीवन, समाजातील त्यांचे योगदान आणि स्त्रीसन्मान याविषयी त्यांनी उपस्थितांना जागरूक केले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा विशेष सन्मान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्र, न्यायालयीन सेवा, क्रीडा, शिक्षण, कला, व्यवसाय, कृषी, संरक्षण, संगीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच घर सांभाळणाऱ्या गृहिणींनाही त्यांच्या मोलाच्या कार्यासाठी मानाचा मुजरा देण्यात आला.
माननीय अश्विनीताई चिंचवडे यांनी महिलांना प्रोत्साहन देत समाजात महिलांची भूमिका आणि महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जीवनविद्या मिशनच्या सर्व मान्यवरांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवनविद्या मिशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.










