ताज्या घडामोडीपिंपरी

साई चौक,पिंपरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पहिल्या वाहनमुक्त दिनाचे उद्घाटन

उपक्रम शहरात इतरत्र राबवावा-उद्घाटक - खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचे प्रतिपादन

Spread the love

दोन दिवस झुंबा, लाईव्ह संगीत, सायकलींग,पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे,त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच पर्यावरणाला हानी पोहचत आहे.शहरात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पादचारी नागरिकांना देखील वाहतूक समस्या भेडसावत असते,या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नियोजन करून शहरात प्रथमच गजबजलेल्या पिंपरी बाजारपेठेत वाहन मुक्त दिवसाचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविला आहे तसाच उपक्रम शहरातील इतर ठिकाणीही राबवावा असे प्रतिपादन खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते शगून चौक आणि शगून चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) अशा अनोख्या प्रकारच्या पहिला वाहन-मुक्त दिवसाचे उद्घाटन खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आयोजित पहिल्या वाहन-मुक्त दिनात पुढील दोन दिवस चालणा-या या उपक्रमात झुंबा, लाईव्ह संगीत, सायकलींग, पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन आले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना दोन दिवस पिंपरी बाजारात वाहन मुक्त वातावरणात खरेदीचा आनंद घेता येणार आहे तसेच लहान मुलांना विविध खेळणी प्रकारांचा,सर्वासाठी विविध खाद्यपदार्थाचा,सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा देखील उपक्रमात समावेश आहे.

या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, माजी नगरसदस्य डब्बू आसवानी,संदीप वाघेरे,माजी नगरसदस्या निकीता कदम,मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड,उप आयुक्त सिताराम बहुरे,क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, राजेंद्र शिंदे,नितीन निंबाळकर,बाळू लांडे, विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,उप अभियंता सुनिल पवार,शिरीष पोरेड्डी,आयटीडीपी संस्थेचे प्रांजल कुलकर्णी,डिझाईन शाळेचे आशिक जैन,प्रसन्न देसाई आणि सहकारी यांच्यासह स्थानिक व्यापारी व दुकानदार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणले की, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पहिला ‘वाहन मुक्त दिन’ हा एक स्तुत्य उपक्रम ठरणार आहे. यामुळे आज ज्या पिंपरी मार्केट मधील रस्त्यावर चालता येत नव्हते त्या रस्त्यांवर आज लहान मुले खेळ खेळताना दिसत आहेत. या माध्यमातून पादचारी नागरिकांना चालण्यासाठी चांगले मार्ग उपलब्ध होणार आहेत. याबद्दल महापालिका प्रशासन कौतुकास पात्र आहे. देशभरात विविध शहरांमध्ये वाहतूक समस्या सोडविण्यासाठी व नागरिकांना रस्तांवर चालताना अडचणी येऊ नये म्हणून वाहन मुक्त दिन साजरा केला जात आहे.

वाहन-मुक्त दिनानिमित्त संपूर्ण पिंपरी बाजारपेठ क्षेत्र सुशोभित करण्यात आले आहे. या वाहनमुक्त दिवसाचा मुख्य उद्देश नागरिकांना मोकळ्या रस्त्यांचा आनंद घेण्यास संधी देणे आहे, जिथे ते चालू शकतील आणि बाजार परिसराचा आनंद घेऊ शकतील. यासोबतच हा उपक्रम पिंपरी बाजारपेठेत पादचाऱ्यांसाठी आणि सायकलस्वारांसाठी पूरक वातावरण निर्मिती करणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती करणे यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये सातत्य ठेऊन असे उपक्रम आयोजित करून नागरिकांचा पर्यावरण पूरक उपक्रमात सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याशिवाय या उपक्रमाद्वारे नागरिक व विक्रेत्यांच्या,व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया, सर्वेक्षण व चर्चांद्वारे भविष्यातील आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठीही सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू गायकवाड यांनी सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार शिरीष पोरेड्डी यांनी मानले.

वाहन मुक्त दिवस उपक्रमात

•रस्ते सुरक्षा, कमी प्रदूषण क्षेत्र, पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकचे महत्त्व, सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या सहभागावर चर्चासत्रांचे आयोजन.

•सर्व वयोगटांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम.

•कार्यक्रमस्थळी संपूर्ण ५०० मीटर रस्त्यावर उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना.

•सार्वजनिक शौचालये आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र व्यवस्था.

•झुंबा, हास्ययोग, लाईव्ह संगीत, पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ यांसारख्या उपक्रमांचे आयोजन.

•८ मार्च – महिला दिनानिमित्त नृत्यप्रदर्शन, खेळ पैठणीचा, लाईव्ह संगीत, प्रश्नमंजुषा व अन्य मनोरंजनात्मक उपक्रम.

चौकट – उपक्रमाचे मुख्य आकर्षण:
•”चाय पे चर्चा” या कार्यक्रमात माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी व नागरिक थेट साधतील संवाद.

•सार्वजनिक वाहतूकीस चालना देण्यासाठी नागरिकांमध्ये करण्यात येणार जनजागृती.

•चारचाकी, दुचाकी आणि इतर वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था यासारख्या उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button