पिंपरी चिंचवड ऑलिंपिया गेम्सची क्रिडाज्योत प्रज्वलित
माध्यमिक व उच्च माध्यमिक शारिरीक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजन
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शारिरीक शिक्षण शिक्षक महामंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच ऑलिंपिया गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१० ते २२ जानेवारी या काळात होणाऱ्या या स्पर्धेची “क्रिडाज्योत” महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.
गुरुवारी निगडी येथील भक्ती शक्ती समुहशिल्प येथे झालेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, खंडेराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत बालवडकर, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या संचालक राम रैना, हॉकीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अजितेश रॉय, न्यू पूना पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुहास तोहगावकर, महाराष्ट्र व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष तृप्ती धनवटे-रामाने, महामंडळाचे सचिव महादेव फपाळ, समन्वयक निवृत्ती काळभोर, सुधीर हातवडकर आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
भक्ती शक्ती समूह शिल्पाला पुष्पहार अर्पण करून क्रिडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. यानंतर लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात ही क्रिडाज्योत धावत आकुर्डी येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी नेली. दि.१० जानेवारी पर्यंत पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, दापोडी, सांगवी भागातील शाळांमध्ये या क्रिडाज्योतचे संचालन करून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. १० जानेवारीला ही क्रिडाज्योत उद्घाटन स्थळी आणून ऑलिंपिया गेम्सचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
शुक्रवारी ही क्रिडाज्योत प्राधिकरण मधील न्यू पुना पब्लिक स्कूल नंतर रावेत येथील क्रिएटिव्ह मीडियम स्कूल, थेरगाव येथील खिंवसरा विद्यालय, काळेवाडीतील एम. एम. विद्यालय, रहाटणी येथील श्रीमती सावित्रीबाई पाल विद्यालय, सांगवीतील बा. रा. घोलप हायस्कूल, नवी सांगवी येथील दापोली मिशन स्कूल, दापोडीतील गणेश इंटरनॅशनल स्कूल आणि मोरवाडी, पिंपरी येथील एसएनबीपी स्कूल या ठिकाणी क्रिडाज्योतीचे संचलन होणार आहे.